फोटो सौजन्य: Gemini
गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू असताना कर्जतचे माजी तहसीलदार गुरु बिराजदार यांच्या बदलीनंतर नव्याने रुजू झालेले तहसीलदार रवी सतवन, नायब तहसीलदार मोहसीन शेख व मंडळ अधिकारी धुलाजी केसकर यांच्या शासकीय पथकावर वाळूने भरलेला टिपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि. १७ रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास तहसीलदार रवी सतवन व त्यांचे पथक कर्जत–वालवड रस्त्यावर गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते. यावेळी वालवड रोडलगत असलेल्या हॉटेल साई समोर अनधिकृत वाळू वाहतूक करणारा टिपर (MH 14 LL 3983) आढळून आला.
तपासणीदरम्यान टिपर चालक अजय अशोक गोरे (रा. मिरजगाव, ता. कर्जत) याने तात्काळ टिपरमधील वाळू रस्त्यावर खाली केली. त्यानंतर पथकाच्या शासकीय वाहनावर टिपर घालत अधिकाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि टिपर कर्जतच्या दिशेने वेगात पळवून नेला.
Amaravati News: काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी
तहसीलदार रवी सतवन यांनी शासकीय वाहनातून टिपरचा पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान, गोरे याचा साथीदार आकाश अशोक गोरे (रा. मिरजगाव) हा जीप (MH 16 DC 9763) या खाजगी वाहनातून पथकाचा पाठलाग करत शासकीय वाहनाला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता.
कर्जतच्या दिशेने जात असताना महावितरणच्या 132 केव्ही विद्युत उपकेंद्राजवळ टिपर थांबवण्यात आला. तेथे तहसीलदार व त्यांच्या पथकाने टिपरला घेराव घातला असता पुन्हा अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
खाली टाकण्यात आलेल्या वाळूचा रीतसर पंचनामा करण्यात आला. मंडळ अधिकारी धुलाजी केसकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात टिपर चालक अजय अशोक गोरे व जीप चालक आकाश अशोक गोरे यांच्याविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणणे व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






