कल्याण: साहेब आमच्या नळाच्या लाईनला पाणी नाही तर आम्ही पाणी चोरी कुठून करणार ? तुम्ही सकाळी या पाण्याच्या लाईनला पाणी आहे का नाही ते पाहा आणि नंतर पाणीचोरीचा (Water Theft) आरोप करा, अशी संतप्त प्रतिक्रिया संदपमधील स्थानिक ग्रामस्थांनी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या धाडीनंतर दिली आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल डोंबिवली (Dombivali) संदपगाव परिसरातील तीन ठिकाणी धाडी टाकत टँकर पाणी पुरवठ्यासाठी पालिकेच्या पाईपलाईन मधून पाणी चोरी होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पथकाने या ठिकाणी धाव घेत जोडणी अनधिकृत आहे का? या ठिकाणी पाणी चोरी होतेय का ? याची तपासणी सुरू केली. या तपासणीत उद्योगमंत्र्यांनी धाड टाकलेल्या तिन्ही ठिकाणी कोणतेही अनधिकृत पाणी कनेक्शन नसून बोअरवेल व खदानी मधील पाणी फिल्टर करून वापरलं जातं. याबाबतची कागदपत्रे प्रभाग अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर ग्रामस्थांनी मात्र संताप व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांमध्ये भेडसावणाऱ्या पाणीटंचाईची शासनाने दखल घेतली. येथील 27 गावांमधील संदप गाव परिसरात टँकर माफियांकडून मोठ्या प्रमाणात पालिकेच्या पाईप लाईनमधून पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काल रात्रीच्या सुमारास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली संदप गाव परिसरात तीन ठिकाणी अचानक धाडी टाकल्या. या ठिकाणी टॅपिंग करत पाण्याचा कारखाना तर दोन ठिकाणी टॅपिंग करत टँकर भरला जात असल्याचे उघडकीस आणले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले.
मंत्र्यांच्या धाडीनंतर खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनाचं पथक आज संदप गावात दाखल झाले. त्यांनी मिनरल वॉटरच्या प्लँट्ससह इतर दोन ठिकाणी देखील तपासणी केली. धाड टाकलेल्या तिन्ही ठिकाणी पाहणी केली. या तिन्ही ठिकाणी बोअरवेल व खदानीमधील पाणी फिल्टर करत टँकर पाणी पुरवठ्यसाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी मात्र मंत्र्यांच्या धाडसत्रावर नाराजी व्यक्त केली.
याबाबत पालिका अधिकारी किरण वाघमारे यांनी सांगितलं की, या तिन्ही ठिकाणी बोअरवेल व खदानीमधील पाणी फिल्टर करून वापरलं जातं. याबाबतचे कागदपत्र प्रभाग अधिकाऱ्यांकडे सादर केले जाणार आहे.अनधिकृत पाणी कनेक्शन घेऊन ते पाणी टँकर पुरवठ्यासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.
दुसरीकडे संजू पाटील या स्थानिक ग्रामस्थाने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही येथे स्थानिक नागरिक आहोत. कुठे ही जाणार नाही. रात्री एक वाजता यायचं काय कारण होतं.. दिवसा यायचं होतं ..निष्कारण आमची बदनामी का करता, तुम्ही दिवसा इथे या आमच्या नळाच्या लाईनलाच पाणी नाही तर पाणी चोरू कुठून ? असा प्रश्न उद्योगमंत्र्यांना विचारला. अधिकाऱ्यांना पण माहिती आहे आमच्या बोअरवेल आहेत खदानी आहेत. तुम्ही निष्कारण कुणाचं तरी ऐकून आमची बदनामी करू नका. तुम्ही इथे सकाळी दहा वाजता या इकडच्या पाण्याच्या लाईनला पाणी आहे का नाही ते बघा नंतर पाणी चोरीचे आरोप करा असं म्हणत ग्रामस्थाने संताप व्यक्त केला.