मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) शिवसेनेच्यावतीने (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) या दोघांनी आपले उमेदवारीचे अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत हे अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यातील ६ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. सध्या विविध पक्षीय बलानुसार भाजपचे दोन, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. याशिवाय एका जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केला आहे. या सहाव्या जागेवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती उत्सुक होते. या सहाव्या जागेसाठी अपक्ष म्हणून मला निवडून द्यावे अशी मागणी त्यांनी व्यक्त केली होती. तर, शिवसेनेने त्यांना पक्षात प्रवेश करून उमेदवारी स्वीकारण्याची गळ घातली होती. मात्र, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला. अखेर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली.
राज्यसभेतून महाराष्ट्राचे भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम हे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.
शिवसेनेने संजय राऊत यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापनेत त्यांचा असलेला वाटा आणि तिन्ही पक्षांमधील वेळोवेळी समन्वयकाची भूमिका यांनी संजय राऊत यांनी निभावली आहे. आज चौथ्यांदा त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
संजय पवारांबद्दल सांगायचं तर शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या ९ वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत.