PM मोदी, एकनाथ शिंदेंना ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचं निमंत्रण; जागराला यावं म्हणत संजय राऊतांनी डिवचलं
महायुती सरकारने राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून त्रिभाषा धोरणाचा शासकीय आदेश काढला होता. मात्र राज्यातून वाढता विरोध आणि ठाकरे बंधूंनी दिलेला मोर्चाचा इशारा, यामुळे सरकारने नमतं घेत, निर्णय रद्द केला. त्यामुळे ठाकरे बंधूनी हा मोर्चा रद्द न करता मोर्चाचं विजय रॅलीत रुपांतर केलं, येत्या ५ जुलैला विजयी रॅली काढण्यात येणार आहे. या विजयी रॅलीचं आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत संजय राऊत यांनी डिवचलं आहे.
संजय राऊत यांनी, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना एक्सवर टॅग करत या विजयी मेळाव्याचं निमंत्रण दिलंय. महाराष्ट्राच्या शत्रूंना आणि मराठीच्या मारेकऱ्यांना आव्हान आणि आवाज देणारी घडामोड. यावं जागराला यावं, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
आवाज मराठीचा, असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं, कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या, असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना आवाहन केलंय.
महायुती सरकारने त्रिभाषा धोरणाचा जीआर (शासकीय निर्णय) मागे घेतल्यानंतर ठाकरे आणि मनसेने मिळून हा ‘जनशक्तीचा विजय’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज आणि उद्धव ठाकरे यांनी त्रिभाषा धोरणावर प्रखर टीका करत जनआंदोलन उभं केलं होतं. मोर्च्याची तयारी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अचानक निर्णय मागे घेत, राजकीय खेळी केली. मात्र, दोन्ही ठाकरे बंधूंनी या निर्णयाचं श्रेय महाराष्ट्रातील जनतेच्या दबावाला दिलं.
Sindhudurg Politics: महायुतीत मिठाचा खडा; भरत गोगावलेंच्या विधानाने सिंधुदुर्गात राजकारण तापलं
हा मेळावा केवळ एका धोरणाच्या विरोधात मिळवलेल्या विजयाचा उत्सव नाही, तर तो मराठी अस्मितेच्या एकत्रित लढ्याचं प्रतीक म्हणून पाहिला जातोय. ठाकरे आणि मनसे यांच्यातील राजकीय जवळीक, हा मेळावा पाहता आणखी दृढ होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. या मेळाव्यात दोन्ही नेते काय भूमिका मांडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण या मंचावरून आगामी निवडणुकांसाठी मराठी मतांची दिशा ठरू शकते.