विधानसभा अध्यक्षांचा खरंच अपमान केला का? सभागृहात नेमकं काय घडलं; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
Assembly Session 2025: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. बबनराव लोणीकर आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले होते. कृषीमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांंनी सभागृहात केली. त्यावरून मोठा गदारोळ झाला आणि विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केले. या सर्व प्रकारावरून माध्यमाशी बोलताना नाना पटोलेंनी पुन्हा एकदा सभागृहात घडलेल्या प्रकारावर निशाणा साधला. मला रोज निलंबित केले तरी चालेल पण शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. तसेच सभागृहात घडलेल्या प्रकारावरही भाष्य केलं.
नाना पटोले म्हणाले, “”आज अवकाळी पावसामुळे शेतकरी उदध्वस्त झाला आहे. पिकेच्या पिके नाहीशी झाली आहेत. शेतीचा हंगाम असूनही त्यांच्याकडे पैसे राहिले नाहीत. शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन दिले होते. तोही दिला नाही. कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले, तेही पूर्ण केले नाही. आता पीकविमाही बंद करून टाकला. पण आम्ही आवाज उठवत राहणार, एक दिवस काय दररोज निलंबित केलं तरी हरकत नाही आम्ही शेतकऱ्यांसाठी बोलत राहणारच. उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू, जोपर्यंत लोणीकर आणि कोकाटे यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही.”
Mumbai : शिवतीर्थावर मेळावा घ्यायचा होता पण सरकार परवानगी देणार नाही
आज शेतकऱ्यांचा दिवस आहे. त्यानिमित्त मी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो. पण केंद्रातील सरकार माजलेलं भाजप महायुतीचं सरकार आहे. या सरकारची वास्तविकतापुढे आली आहे. ते शेतकऱ्यांना भिकारी समजत आहेत. 2014 पूर्वी हा लोणीकर उघडाच फिरत होता. हे आम्ही पाहिलं आहे. पण जो शेकऱ्यांच्या बद्दल बोलेल त्याला निलंबित करायचं आणि जे शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात त्यांना सभागृहात मान द्यायचा. असं हे भाजप सरकार आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पटोले म्हणाले, या सरकारमध्ये थोडी जरी धमक असती तर त्यांनी पुढाकार घेतला असता. लोणीकर आणि कोकाटे यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचा अपमान केला त्यावर पुढे येऊन भूमिका मांडली असती, चूक मान्य केली असती आणि शेतकऱ्यांची माफी मागितली असती. असंही त्यांनी नमुद केलं.
निलंबनाच्या संदर्भात विचारलेल्य प्रश्नाव बोलताना नाना पटोले म्हणाले, “मी अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहचलो, मी अध्यक्षांचा अपमान केला, त्यांना धमकावलं अशा पद्धतीने रेकॉर्डवर आणलं. मीही विधानसभा अध्यक्ष राहिलो आहे. नियम मलाही माहिती आहेत. पण ज्यावेळी अध्यक्षच जनतेचे प्रश्न दाबतो, विरोधकांचा आवाज दाबला जातो, तिथे विरोधकांना ही भूमिका घ्यावी लागते,हे लोकतंत्र आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या सर्टिफीकेटची गरज नाही.”
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “अध्यक्षांपर्यंत पोहचण्याचा हा पहिला प्रकार नाही. नाना पटोले तर अध्यक्षांपासून खूप लांब होते. ते एकटेच होते.आताचे सत्ताधारी ज्यावेळी विरोधी पक्षात असताना आम्ही तर आख्खी झुंड अध्यक्षांना घेरलेली पाहिली आहे. आकसाने आपल्या अंगावर हे प्रकऱण आपल्यावर येतय असं दिसत असताना सत्ताधारी प्लॅन करून नानांना बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही. अशा पद्धतीने लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवले जात आहेत. विधानसभेत आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या उद्देशाने नाना पटोलेंनी हे पाऊल उचललं असेल तर आम्ही त्यांचे समर्थन करतो.”