'व्यापारी नेहमी खोटे बोलतो, भेसळ करतो...', संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य (फोटो सौजन्य-X)
आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले. केंद्रिय मंत्री अमित शहा हे एक व्यापारी आहेत. व्यापारी नेहमी खोटे बोलतात. दुकानदार हा आपल्या फायद्यासाठी एक तर भेसळ करतो किंवा खोटे खोलतो. ग्राहकाला फसवतो’, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. खासदार राऊत यांच्या वक्तव्यानंतर व्यापारी वर्गात असंतोष उफाळून आला आहे. राऊत यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध आंदोलन करू, त्यांना या निवडणुकीत आम्ही किती खरे बोलतो हे दाखवून देऊ, असा इशाराही दिला आहे.
खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजप आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात आज राजकारणाचा चिखल झाला आहे. याला अमित शहा हेच जबाबदार आहेत. त्यांची व्यापारी आणि खाऽऽखा वृत्ती आहे. महाराष्ट्र लुटण्यासाठी, ओरबाडण्यासाठी आणि मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी तीन-चार वर्षांपासून अमित शहा यांच्यासारख्या व्यापाऱ्यांनी षड्यंत्र रचले, असा आरोपही केला. ३७० कलमाला शिवसेनेने विरोध केलेला नाही. याउलट पाठिंबाच दिला आहे. काही भूमिका मांडल्या असतील. पण, ३७० कलम हटवून आपण काय दिवे लावले, असा सवालही खासदार राऊत यांनी केला.
हे सुद्धा वाचा: 77 वर्षानंतर महाराष्ट्रातील ‘या’ गावात पहिल्यांदाच मतदान केंद्रावर होणार मतदान
खासदार संजय राऊत दररोज प्रसारमाध्यमांशी बोलतात. कुणावर तरी निराधार आरोप करतात. ते राजकारणी आहेत. त्यांनी असले आरोप खुशाल करावे. पण, आम्हा व्यापाऱ्यांना मध्येच ओढायची गरज नव्हती. व्यापारी खोटे बोलतात, भेसळ करतात हे आरोप त्यांनी कुठल्या आधारावर केले? आम्ही आमचा व्यवसाय करतो. प्रामाणिकपणे करतो. भ्रष्टाचार करणाऱ्या, घरात बसून सत्तेचा गाडा हाकण्याची स्वप्ने रंगविणाऱ्यांना आम्हा व्यापाऱ्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत व्यापाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाट बिकट होणार, असा धोका व्यक्त होऊ लागला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वीर सावरकर यांच्याबद्दल चांगले शब्द बोलावेत, असे उद्धव ठाकरे काँग्रेस किंवा राहुल गांधी यांना सांगू शकतात का, असे आव्हान देत सत्ता स्थापन करताना आम्ही अन्य कुणालाही संधी देणार नाही, असे म्हटले होते.यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत म्हणाले की, “सत्ता कुणाला द्यायची किंवा सत्तेपासून कुणाला लांब ठेवायचे, हे अमित शाह ठरवणार नाहीत, तर महाराष्ट्राची जनता ठरवेल. अमित शाह यांनी या महाराष्ट्रातील ४० आमदार विकत घेतले असतील, पण महाराष्ट्रातील १४ कोटी जनता विकत घेतलेली नाही. अमित शाह महाराष्ट्राचे नेते नाहीत. अमित शाह गुजरातचेही नेते नाहीत. अमित शाह देशाचे नेते कधीच होऊ शकणार नाहीत.”
हे सुद्धा वाचा: महाराष्ट्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी