फोटो सौजन्य - Social Media
सातारा : सातारा शहरातील सांस्कृतिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र असलेल्या शाहू कला मंदिरातील विविध सुविधांच्या दुरवस्थेबाबत सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या नाराजीनंतर सातारा पालिका प्रशासनाने तातडीने हालचाल सुरू केली आहे. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शुक्रवारी शाहू कला मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान शौचालयांची अस्वच्छ अवस्था, नादुरुस्त पडदे, मेकअप रूममधील अपुऱ्या सुविधा, वातानुकूलन यंत्रणेतील बिघाड तसेच इतर मूलभूत सुविधांमधील त्रुटी निदर्शनास आल्या. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाकडून तातडीने दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच देखभाल आणि स्वच्छतेसंदर्भातील कामांच्या गुणवत्तेबाबत संबंधित ठेकेदारांकडूनही खुलासा मागविण्यात आला.
शाहू कला मंदिरातील आवश्यक दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी नाट्यगृह पुढील दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत नियोजित असलेले काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाट्यप्रयोग पुढे ढकलावे लागणार आहेत.
रंगकर्मी आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी शाहू कला मंदिरातील समस्या दीर्घकाळापासून असल्याचे सांगितले असून, वेळोवेळी त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतल्याने या विषयाची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले की, शाहू कला मंदिरातील सर्व आवश्यक सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नाट्यगृह अधिक सक्षम आणि सुविधायुक्त करण्यासाठी आवश्यक ती सर्व कामे करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुरुस्तीच्या कामांनंतर शाहू कला मंदिर अधिक आधुनिक, सुसज्ज आणि कलाकारांसाठी अनुकूल स्वरूपात उपलब्ध होईल, अशी अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. मात्र, या कामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






