फोटो सौजन्य - Social Media
सातारा : जिल्ह्यात शेतीसाठी नदीपात्रातून होणारा पाणी उपसा अचानक थांबविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. बैठकीत शेतकरी नेत्यांनी प्रशासनाकडे पाणी उपसा तातडीने सुरू करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. बैठकीदरम्यान शेतकरी प्रतिनिधींनी सध्याच्या परिस्थितीत धरणातील मूळ पाणीसाठ्यावर परिणाम न करता नदीपात्रात उपलब्ध असलेले पाणी पुढील काही दिवस शेतीसाठी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. तसेच कृषी पंपांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा त्वरित पूर्ववत करण्याचीही मागणी करण्यात आली.
शेतकरी संघटनांनी प्रशासनासमोर स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, पाणी व वीजपुरवठा सुरू करणे शक्य नसल्यास अधिकाऱ्यांनी तातडीने शेतांमध्ये जाऊन पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा उद्भवणाऱ्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मागण्या शासनाच्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. शासनाशी चर्चा करून शनिवारी दुपारपर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय कळविला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. उद्यापर्यंत समाधानकारक निर्णय न झाल्यास सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास नागठाणे-बोरगाव परिसरातील प्रमुख महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.
शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली. पूर्वसूचना न देता पाणी उपसा बंद करण्यात आल्याने उभ्या पिकांवर संकट ओढवले असून स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता घेतलेला हा निर्णय असल्याची टीका करण्यात आली.
पाणीटंचाईच्या या प्रश्नावर शासन आणि प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






