सर्वे क्रमांक २४६ ते २४८ परिसरातील रहिवाशांच्या मते, पालिकेच्या खुल्या जागेवर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे परिसराच्या नियोजनबद्ध विकासावर परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.
देवराज कामाठी, महेश कामाठी, राजेंद्र भोसले, महेंद्र भोसले, मालन भोसले, रवींद्र कामाठी, सारिका भोसले यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. अतिक्रमणामुळे त्यांच्या घरांकडे जाणाऱ्या मार्गावर अडथळे निर्माण झाले असून दैनंदिन वाहतूक व अन्य सोयी-सुविधांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाल्यानंतरही त्यांनी मूळ जागांवरील अतिक्रमण कायम ठेवले असून सार्वजनिक जागेवरही अतिक्रमण वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नगराध्यक्ष अमोल मोहिते हे शहराबाहेर असल्याने आंदोलकांनी मुख्याधिकारी विनोद जळक यांची भेट घेतली. यावेळी जळक यांनी संबंधित जागेची पाहणी व सर्वेक्षण करून वस्तुस्थितीची पडताळणी केली जाईल तसेच नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
पालिकेची जागा अतिक्रमणमुक्त करून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली असून प्रशासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






