फोटो सौजन्य- pinterest
गर्दीच्या लोकलमधील प्रत्येक प्रवास हा आता केवळ वेळेशी स्पर्धा राहिलेला नाही, तर सुरक्षिततेचाही प्रश्न बनला आहे. गेल्या काही महिन्यांत हाणामाऱ्या, चाकूहल्ले, मिरची स्प्रे, महिलांशी गैरवर्तन आणि चोरीच्या वाढत्या घटनांनी उपनगरीय रेल्वेतील सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर लोकलमधील प्रत्येक हालचालीवर डिजिटल नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. एकूण २,१९४ डब्यांपैकी ८८८ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित झाले असून, उर्वरित १,३०६ डब्यांमध्ये कॅमेरे बसविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण लोकल ताफा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली येणार आहे. लोकलमधील गुन्ह्यांच्या तपासात पुराव्यांचा अभाव ही मोठी अडचण होती. मात्र, सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित झाल्यानंतर गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी होणार आहे.
संपूर्ण उपनगरीय ताफ्यात सीसीटीव्ही बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असून, जनरल डब्यांमध्येही ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या १,१८० जनरल डब्यांपैकी ९४ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत, तर उर्वरित डब्यांमध्ये कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच ९६ जनरल डब्यांमध्ये टॉक-बॅंक प्रणाली उपलब्ध असून, उर्वरित डब्यांमध्येही ही सुविधा विस्तारली जाणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधणे अधिक सोपे होणार असून, सुरक्षाव्यवस्थाही अधिक सक्षम होईल.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मध्य रेल्वेने महिलांसाठी राखीव सर्व ७९४ -१,०८४ डब्यांमध्ये सीसीटीव्ही आणि टॉक-बॅंक प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळविणे, तसेच घटनांची नोंद घेणे अधिक सुलभ झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच लोकलच्या सुरक्षित संचालनावरही मध्य रेल्वेने भर दिला आहे. एकूण ३२० मोटरमन कॅबपैकी ७१ कॅबमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, उर्वरित २५१ कॅबमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत
एकूण डबे २,१९४
सीसीटीव्ही कार्यान्वित ८८८
निविदा प्रक्रियेत १,३०६
एकूण डबे -१,१८०
सीसीटीव्ही असलेले ९४
सीसीटीव्ही नसलेले १,०८६
टॉक-बैंक प्रणाली असलेले ९६
टॉक-बैंक प्रणाली नसलेले ९,०८४
एकूण डबे ७९४
सीसीटीव्ही ७९४
टॉक-बॅंक प्रणाली ७९४






