संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद कन्या शाळेतील 7 विद्यार्थिनींना सकाळी खिचडी खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याने मळमळ होवून उलट्या होण्यास सुरूवात झाली होती. मुलींना उलट्या व मळमळ होत असल्याचे कळताच शाळा प्रशासनाने त्वरित मुलींना घाटी दवाखान्यात नेले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. विद्यार्थिनींना नेमके कोणत्या कारणाने विषबाधा झाली याचे कारण मात्र कळू शकले नाही.
शहरातील औरंगपुरा येथील जिल्हा परिषद कन्या विद्यालयात सकाळी विद्यार्थिनी नियमित ७ वाजता शाळेत आल्या होत्या, सकाळी शाळेत देण्यात आलेली खिचडी खाल्ल्यानंतर काही मुलींना मळमळ होणे, पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याची तक्रार मुलींनी केली. त्यानंतर त्वरित त्या मुलींना शाळेतील शारीरीक शिक्षणाचे शिक्षक कृष्णा शिंदे यांनी घाटी रूग्णालयात तपासणी व उपचारासाठी आणले होते. या मुलींमध्ये वाळूज पंढरपूर रोडवरील गोलवाडी येथील पाच विद्यार्थीनींचा समावेश होता. तर दोन विद्यार्थिनी या नारेगाव परिसरातील होत्या. विद्यार्थिनींच्या पालकांनी मुलींना खिचडी खाल्ल्याने त्रास झाल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
याप्रकरणी माहिती देताना शाळेच्या शिक्षकांनी सांगितले की, शाळेत ३५ ते ४० विद्यार्थीनी होत्या त्यापैकी केवळ या सात विद्यार्थिनींना मळमळ व पोट दुखीचा त्रास होत असल्याने आम्ही त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन आलो आहोत. दरम्यान, मुलींना खिचडी खाल्ल्याने की दुसऱ्या कोणत्या कारणाने विषबाधा झाली होती, याचे कारण कळू शकले नाही.