मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतीसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतल्या ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा (Gram Panchayats Election) कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या सर्व ठिकाणी सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी याबाबत काल घोषणा केली आहे. अर्जाची छाननी ५ डिसेंबरला होईल. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. दिनांक १८ डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकांसाठी कालपासूनच निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
दरम्यान, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्यानं स्थापित ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या १८ नोव्हेंबरला अधिसूचना जारी होईल. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दाखल करता येतील. गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, अहमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक जिल्ह्यात ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.