कल्याण : गावी जाण्यासाठी कल्याण एसटी डेपो बसमध्ये चढत असताना आरपीएफ जवानाच्या पत्नीच्या बॅगेतून चोरट्याने तब्बल ७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची आज दुपारच्या सुमारास घटना घडली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याण स्टेशन परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रवासी नागरिकांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरणे पाकीट मारणे अशा अनेक घटना स्टेशन परिसरात घडत आहेत. अशीच एक घटना आज स्टेशन परिसरातील कल्याण एसटी डेपो मध्ये घडली. आरपीएफ मध्ये कार्यरत असलेल्या जवानाची पत्नी सारिका शिंदे या आपल्या गावी जाण्यासाठी कल्याण एसटी डेपोमध्ये बसची वाट पाहत होत्या. त्यांच्या जवळील पर्स सात तोळे सोन्याचे दागिने होते. बस आल्याने सारिका आपल्या मुलगा आणि मुलांसह बस मध्ये चढत होत्या. यावेळी त्यांनी दागिने असलेली थैली आपल्या मुलीकडे दिली.
बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्स मधून सात तोळे सोन्याचे दागिने चोरले. काही वेळानंतर शिंदे यांच्या बॅगेतून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले मात्र तोपर्यंत हा चोरटा पसार झाला होता. याप्रकरणी सारिका शिंदे यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली . या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.