उन्हाळ्याच्या (Summer दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पाणी प्रश्न गंभीर होतो. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना हजारो मैलांपर्यंत पाणी आणण्यासाठी जावे लागते. राज्यातील काही भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईमध्ये मराठवाडा (Marathwada Water Crisis) जिल्हा आघाडीवर असल्याने सध्या तिथे फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यामधील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये १७.३० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत आणखीन पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पिण्याचे पाणी पुरवले जाते मात्र याच धरणात ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
मराठवाड्यातील ११ धरणांमधील पाणीसाठा
जायकवाडी ८ टक्के
येलदरी ३० टक्के
सिद्धेश्वर २ टक्के
माजलगांव ० टक्के
मांजरा ३ टक्के
उर्ध्व पेनगंगा ४१ टक्के
निम्न तेरणा ० टक्के
निम्न मनार २७ टक्के
विष्णुपुरी ३० टक्के
निम्न दुधना ० टक्के
सिना कोळेगांव ० टक्के
राज्यभरात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालल्याने अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. आत्तापर्यंत तब्बल १ हजार ४२४ टँकरने पाणीपुरवठा केल्याचे समोर आले आहे. हिंगोली जिल्हा वगळता इतर भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणी टंचाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात ५६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर सर्वाधिक कमी पाणीटंचाई परभणी जिल्ह्यात आहे.
पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेल्या जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करता यावा यासाठी सरकारकडून खाजगी विहिरी पडून दिल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३०४, जालना ४१३, परभणी ३८, हिंगोली ४९, बीड ३२२, नांदेड ५७, लातूर २७२ तर धाराशिव जिल्ह्यात ६२८ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाई कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.