मीरा-भाईंदरमध्ये तीव्र पाणीटंचाई! सलग चौथा शनिवार कोरडा; नागरिक त्रस्त, नेत्यांवर निष्क्रियतेचे आरोप
उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेसोबतच मिरा-भाईंदर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सलग चौथ्या शनिवारी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. घरगुती वापरासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली, तर काहींनी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न केला. मात्र टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्यांकडेही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली.(फोटो सौजन्य – AI)
मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर असे एकूण २२१ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे. तथापि, पाणीगळती, तांत्रिक बिघाड आणि वितरण व्यवस्थेतील अडचणींमुळे प्रत्यक्षात शहराला सुमारे २०५ दशलक्ष लिटर पाणीच मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, शहराची दैनंदिन पाण्याची गरज जवळपास २२५ दशलक्ष लिटर इतकी असल्याने उपलब्ध पाणी आणि गरज यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
ही तफावत भरून काढण्यासाठी प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आखण्यात आले असले तरी, पुरवठा सुरळीत असताना त्याचा परिणाम कमी जाणवतो. मात्र पुरवठ्यात व्यत्यय आला की परिस्थिती गंभीर बनत असून, नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मागील काही आठवड्यांपासून शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. नियमित पुरवठ्यात कपात करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. त्यातच सलग चौथ्या शनिवारी भाईंदरमधील नवघर, गोडदेव, काजूपाडा आणि इंद्रलोक परिसरात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून समाजमाध्यमांवर नियमित माहिती प्रसिद्ध केली जात असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, नागरिकांनी केवळ माहिती नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ठोस नियोजन, गळती रोखणे, पर्यायी जलस्रोत उपलब्ध करणे आणि दीर्घकालीन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सलग चौथ्या शनिवारी पाणीपुरवठा खंडित झाल्याने मिरा-भाईंदरकरांचा संयम सुटत असून, आगामी काळात हा प्रश्न अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
कोणतीही पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा बंद केला जात असल्याने दैनंदिन नियोजन कोलमडत आहे. अनेक कुटुंबांमध्ये पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर आवश्यक कामांवर परिणाम होत आहे. भर उन्हाळ्यात पाण्याअभावी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, मिरा-भाईंदर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न नवीन नसून गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय कायम आहे.’सुर्या धरण योजनेचे पाणी लवकरच उपलब्ध होईल’ अशी आश्वासने गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुधारण्यात यश आले नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, नवीन गृहप्रकल्प आणि वाढत्या पाण्याच्या मागणीच्या तुलनेत पायाभूत सुविधांचा विकास अपेक्षित वेगाने झाला नसल्याने पाणीप्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.






