मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार
विजय काते, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर शहराच्या भविष्यातील विकासाची दिशा ठरविणाऱ्या सुधारित विकास आराखड्यात (डीपी) राज्य शासनाने तब्बल १६४ महत्त्वपूर्ण फेरबदल प्रस्तावित केले असून, उद्याने, बाजार, कत्तलखाना, बस डेपो, सार्वजनिक सुविधा, पार्किंग, शैक्षणिक आरक्षणे आणि डीपी रस्त्यांमध्ये मोठे बदल सुचविण्यात आले आहेत. या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेची विशेष महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत राज्य शासनाने सुधारित विकास आराखड्यातील या बदलांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. प्रस्तावित फेरबदलांमध्ये काही आरक्षणे रद्द करणे, काहींचे स्वरूप बदलणे, नवीन आरक्षणे निर्माण करणे तसेच निवासी क्षेत्र, सार्वजनिक सुविधा आणि रस्त्यांच्या आराखड्यात बदल करण्याचा समावेश आहे.
सर्वाधिक लक्षवेधी बदल म्हणजे उत्तन येथील आरक्षण क्रमांक ३१ मधील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करून त्या ठिकाणी उद्यानाचे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक सुविधा, पार्किंग, कम्युनिटी हॉल, राज्य शासन कार्यालय, वैद्यकीय सुविधा आणि इतर नागरी सुविधांच्या आरक्षणांमध्येही बदल सुचविण्यात आले आहेत. काही ठिकाणी उद्याने, शॉपिंग सेंटर आणि शैक्षणिक सुविधांसाठी राखीव असलेल्या जागेचा काही भाग निवासी क्षेत्रासाठी वापरण्याचाही प्रस्ताव आहे.
शहराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ओपन थिएटर, आर्ट गॅलरी, अग्निशमन केंद्र, शिवसृष्टी आणि सार्वजनिक उपयोगिता सुविधांसाठी नवीन आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच अनेक डीपी रस्त्यांच्या रुंदी, मार्ग आणि संरेखनात बदल करण्यात येणार असून, काही प्रस्तावित रस्ते रद्द करण्याचाही विचार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था आणि शहराच्या विकास आराखड्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रस्तावांवर राज्य शासनाने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. महापालिकेच्या विशेष महासभेत यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर नागरिकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यातील हा आतापर्यंतचा सर्वात व्यापक बदल मानला जात असून, शहराच्या विकासाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
– सुधारित विकास आराखड्यात १६४ महत्त्वपूर्ण फेरबदल.
– उद्याने, बाजार, बस डेपो, पार्किंग, सार्वजनिक सुविधा आणि शैक्षणिक आरक्षणांमध्ये बदल.
– उत्तन येथील कत्तलखान्याऐवजी उद्यानाचे आरक्षण प्रस्तावित.
– स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ओपन थिएटर, आर्ट गॅलरी, अग्निशमन केंद्र आणि शिवसृष्टीसाठी नवीन आरक्षणे.
– अनेक डीपी रस्त्यांच्या रुंदी व मार्गात बदल; काही रस्ते रद्द करण्याचाही प्रस्ताव.
– नागरिकांकडून हरकती व सूचना मागविणार; विशेष महासभेत प्रस्तावांवर चर्चा.






