सौजन्य - नवराष्ट्र टीम
नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले होते. त्या छोट्या-छोट्या गावातल्या स्थानिक राजकारणाचा विचार करून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची युती होत आहे या बातमीने अनेकांना धक्का बसला. शरद पवार भाजपविरोधी राजकारण केंद्रस्थानी असल्याचे मानतात. तशी विधानेही करतात आणि त्याचवेळी भाजपबरोबर सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्याशी युतीची बोलणी करतात. हा मुद्दा अनेकांना धक्का देणारा होता.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्ष अजित पवार यांच्याशी युती करत नाही, आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होतील, असे जाहीर करतो. त्यानंतर दोन्ही पवार एकत्र येतात. या घटनाक्रमामुळे कार्यकर्ते गोंधळून गेले. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप वैचारिक विरोध दर्शवत पक्षाचा राजीनामा देतात, ही घटना राजकीय पटलावर मोठी ठरते. त्यामुळे ती चर्चेचा विषय होते. या राजीनाम्यामुळे पक्षाची प्रतिमा डॅमेज होते आणि ती कंट्रोल करण्यासाठी पक्षाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलावे लागते. त्यामुळे घटना मोठी ठरते. जगताप यांनी उपस्थित केलेले प्रश्न भाजपलाही विचार करायला लावणारे आहेत.
प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यावर काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. १०, १२ वर्षांच्या कालावधीनंतर एका मोठ्या नेत्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा बोनस आहे. पुण्याच्या प्रश्नांची सखोल जाण असणारे, संयमी आणि स्पष्ट भूमिका मांडणारे प्रशांत जगताप काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. महापौर म्हणून त्यांची कारकीर्द चांगली होती. पाणी प्रश्नावर त्यांनी भाजपशी संघर्ष केला होता. प्रशांत जगताप सध्या ४७ वर्षाचे आहेत. अजून बराच काळ त्यांना राजकारणात काम करण्यासाठी भरपूर वाव आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांना पाठबळ दिल्यास पुण्यात काँग्रेससाठी चांगले नेतृत्व तयार होईल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे प्रशांत जगताप यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात चुरशीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतरही, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीची पक्षसंघटना बळकट करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यामुळेच एक होतकरू, तरूण, कुशल संघटकही पवारांनी गमावला आहे.






