पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठक पार पडली. पण त्यानंतर अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, पोलिसांचा सरकारी ताफा किंवा पोलिस संरक्षण न घेता अचानक एकटेच बाहेर पडले, त्यामुळे अजित पवार कुठे गेले, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहे. पोलिस संरक्षण, पोलिसांचा ताफा काहीही न घेता अजित पवार अचानक गायब झाल्याने ते नेमके कुठे गेले, का गेले, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.
पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार नियोजित बैठकांसाठी उपस्थित राहत आहेत. याचठिकाणी ते इच्छुकांच्या मुलाखती, बैठका, गाठीभेटी घेत आहेत. पण आज सकाळी बैठकीनंतर मात्र ते अचानक बाहेर पडले, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षा रक्षकांचीही नजर चुकवून ते बाहेर पडल्याने एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी युती करणार असल्याची चर्चा सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादींचे जागावाटपाचे सुत्रही जवळपास निश्चित झाले होते. पण घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून चर्चा फिस्कटली. ही चर्चा फिस्कटल्यानंतर अजित वार बारामती हॉस्टेलमधून तातडीने बाहेर पडले. चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवार एकटेच गेल्याने, त्यातच त्यांचा फोनही नॉट रिचेबल लागत आहे.
दरम्यान, त्यानंतर काही वेळानंतर अजित पवारांची गाडी त्यांच्या जिजाई निवासस्थानी दिसून आली. पण अजित पवार निवासस्थानी आहेत, की दुसरीकडे कुठे, असाही प्रश्न आहे. अजित पवार चीडचीड करत एकटेच बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा ताफा बोलावून घेतला होता.
अजित पवार हे त्यांच्या जिजाई निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे देखील जिजाई निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात जिजाई निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर अमोल कोल्हे जिजाई निवासस्थानातून बाहेर पडताना दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.






