लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जाते आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहे. अशातच खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांचा आता नाईलाज झाला आहे. कारण कोकणात, खानदेश, विदर्भामध्ये त्यांचा कोणताही प्रतिनिधी राहिलेला नाही. त्यांचे मराठवाड्यात देखील कोणतेही प्रतिनिधी नाही. केवळ त्यांचे पश्चिम महाराष्ट्रात दोन-तीन जिल्ह्यात अस्तित्वात शिल्लक राहिले आहे. त्यांच्याकडे आता भरपूर वेळ आहे. त्यामुळे त्यांनी आटा लोकसभा मतदार संघामध्ये वेळ दिला पाहिजे. इथे त्यांच्या चार सभा झाल्या आहेत, त्यांना माझं सांगणं आहे ४ नाही तर ४० सभा घ्या भरपूर वेळ आहे, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
येत्या निवडणुकीमध्ये समोर असलेल्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार आहे. मी ओव्हर कॉन्फिडन्सने बोलत नाही. आता लोकांनी वेळ ठरवायची आहे. शिष्टाचाराच्या बाजूने जायचे की भ्रष्टाचाराच्या बाजूने जायचं ते. लोक कायम स्थिर सरकारला पाठिंबा देतात. समोरच्या बाजूला आपण पाहत आहोत ते अस्थिर आहेत. अजूनही पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला नाही. महाविकास आघाडी पूर्णपणे अधोगतीची बाजूने गेली आहे, असे देखील उदयनराजे भोसले म्हणाले. मी ३५ वर्षांआधी राजकारणाला सुरुवात केली होती. तेव्हापासून विकास हा फोकस ठरला आहे. तेच आताही होत आहे. मागील जन्मात माझ्याकडून पुण्याचे काम झाले असेल, त्यामुळे या राजघराण्यात माझा जन्म झाला. मी केवळ कामाच्या मुद्द्यावर निवडणूका लढवल्या आहेत, असे उदयनराजे भोसले म्हणाले.
उदयनराजे भोसले म्हणाले, दुसऱ्यांवर टीका करणं सोपं असत पण ज्यावेळी एका बोट तुमच्याकडे दाखवतात त्यावेळी चार बोट आपल्याकडे असतात. तुम्ही काय केलं ते सांगा मग दुसऱ्यांवर टीका करा. आता तुम्ही दुसऱ्यांवर टीका करत आहात, आता काही मुद्दा नाही म्हणून संविधान बदलणार असल्याच्या मुद्द्यावरून टीका केली जात आहे. कोण बदलणार संविधान? संविधानाचा नरडं कापण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. गरिबी हटाव देश बचाओ जय जवान जय किसान अंमलबजावणी का केली नाही? हे केलं नाही म्हणून लोकांनी यांना सत्तेतून बाहेर काढून टाकलं, असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.