सौजन्य - नवराष्ट्र टीम
कराड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर्व निकष व नियम बाजूला ठेवत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात मराठा बांधवांच्या वतीने झालेल्या नागरी सत्कारानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनही केले.
शिंदे म्हणाले, कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. मे महिन्यापासून खरीप व रब्बी पिके वाया गेली आहेत. १३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने जर कर्जमाफी केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.
मराठा आंदोलनादरम्यान केलेल्या मदतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, आंदोलकांना निवास व सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडली. सरकारने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही व्यापक सहभागामुळे आंदोलन यशस्वी ठरले. भाजप काही लोकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आणि ओबीसी यांच्याबाबत सरकारने दिलेली स्क्रिप्ट वाचून दोन समाजात दरी पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शशिकांत शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आंदोलकांना मराठा बांधव म्हणून केलेली मदत, हे आपले कर्तव्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.
काही लोकांकडून थोर व्यक्तिमत्वांचा अपमान
शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची ओळख सुसंस्कृत राजकारणाची आहे. मात्र अलीकडे थोर व्यक्तिमत्त्वांचा अपमान करण्याचे धाडस सरकारमधील काही लोक सातत्याने करत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू असून, जागावाटपावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जर त्याला क्रांतीचे रूप दिले, तर निश्चितपणे बदल घडेल, असेही त्यांनी सांगितले.