सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. यावरुन आता शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी गुरनानी यांनी चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गुरनानी म्हणाले, कोथरूडमध्ये सध्या वाहन चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणत घडत आहेत. गुजरात कॉलनी, वनाझ कॉर्नर, आझाद नगर सारख्या वरदरळीच्या ठिकाणी सोसायटीमधून पार्क केलेल्या दुचाकी नेहून पेट्रोल संपेपर्यंत फिरवतात व पेट्रोल संपल्यानंतर गाडी कोठेही सोडून जातात, त्यामुळे गाडी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येते. गाडी चोरी गेलेली तक्रार कराव्यास व्यक्तींची आपण 24 तास वाट पाहू व त्यानंतर गुन्हा नोंदवू असे पोलीसांकडून सांगण्यात येते. व 24 तासानंतर देखील पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात. असा आरोप गुरनानी यांनी केला आहे. चोरट्यानी चोरलेल्या गाडीचा वापर करून दुसरा कुठला गुन्हा केला तर गाडी मालकाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो, असंही ते म्हणाले.
आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पोलीस निरीक्षक देशामाने यांना निवेदन दिले आणि वाहन चोरट्यांना पकडून त्यांच्यावरती कडक कारवाहीची मागणीही केली. या वेळी देशमाने यांनी आठवड्याभरात या चोरांचा तपास करून कडक कारवाई करण्यात येईल असे अश्वासन आम्हाला दिले आणि त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी युवकच्या वतीने करण्यात येईल. असंही गुरनानी यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी ऋषिकेश शिंदे, अमित भगत, अमित नवले, रोहन मिसाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.