कोल्हापूर : शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार धैर्यशील माने (MP Dhairyasheel Mane) यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाकडे निघालेल्या शिवसैनिकांचा निषेध मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी रुईकर कॉलनीतील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती उद्यानजवळ शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत खासदार माने यांचा निषेध केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, संजय पवार, विजय देवणे, रवीकिरण इंगवले, सुनील मोदी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी खासदार माने यांच्यावर जोरदार टीका केली. खासदार माने यांनी पहिल्यांदा खासदारपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली आहे, अशा शब्दांत जाधव यांनी माने यांच्यावर निशाणा साधला. शाहू मार्केटयार्ड चौक येथून कार्यकर्ते मोर्चाने खासदार माने यांच्या निवासस्थानाकडे निघाले असताना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे उद्यानाजवळ मोर्चा अडवला.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खासदार माने यांच्या निवासस्थानापासून २०० मीटर परिसरामध्ये मोठा बंदोबस्त लावला होता. बॅरिकेट्स लावून रस्ता अडवला होता. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व शिवसैनिक यांच्यामध्ये झटापट झाली. पोलिसांनी, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
शिवसैनिक संतप्त
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली. आमदारांपाठोपाठ खासदारसुद्धा शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहेत. आज कोल्हापूरमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला. धैर्यशील मानेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
दोन खासदार शिंदे गटात
कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे आज संतापलेल्या शिवसैनिकांनी धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी ‘गली गली मै शोर है, माने चोर है’ अशा घोषणा देण्यात आल्या. मार्केटयार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं. मात्र, तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानं त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले होते.