शिर्डी : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना शिवसेनेनं पाठिंबा द्यावा, अशी शिवसेना खासदारांनी गळ घातल्यानं अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटात या निवडणुकीच्या निमित्ताने मनोमिलन होण्याची चर्चा रंगली असली तरी मनोमिलनाची आवश्यकता नसून शिवसेना आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत, असे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी सांगितले.
साईबाबांच्या धुपारतीनंतर माध्यमांशी बोलताना सरवणकर यांनी म्हटले की, गुरूपौर्णिमा म्हणजे गुरु पूजनाचा योग. यादिवशी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूजन करत असत. मात्र, आता ते नाहीत, त्यामुळे साईबाबाच आमचे गुरु आहेत. यानिमित्तानं बाबांच्या चरणी येऊन आशीर्वाद घेतले. शिवसेना-भाजपची युती अभेद राहावी, तसेच महाराष्ट्राल वैभव प्राप्त व्हावं, अशी प्रार्थना केल्याचं सरवणकर यांनी यावेळी सांगितले. तसेच अडीच वर्षात आम्ही हिंदूत्वाची चेष्टा केली असा आरोप आमच्यावर होत होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी मुर्म यांना पाठिंबा देऊन उत्तर दिल्याचं शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिर्डीत म्हटलं.
‘मातोश्री’वर जायचं म्हटले तर…
शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात अपात्रेतेची नोटीस बजावली होती. एकीकडे राजकीय संघर्षाला धार आली असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गटाचं मनोमिलन होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आमदार सरवणकर यांनी म्हटलंय की, ‘मातोश्री’वरुन आमचे नेते एकनाथ शिंदे यांना बोलवणं आलं आणि शिंदे मातोश्रीवर जायचं म्हटले तर कोणीच आमदार विरोध करणार नाही किंवा आडकाठी घालणार नाही, असे देखील आमदार सरवणकर यांनी साई दर्शनानंतर शिर्डीत म्हटलं आहे.