'राज ठाकरे बडव्यांना शरण गेले'; प्रताप सरनाईक यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र
मुंबईतील एनएससीआय डोममध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा ऐतिहासिक मेळावा पार पडला. राज्याच्या राजकारणात हा एक ऐतिहासिक क्षण होता. तब्बल 19 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर ठाकरे बंधू एकत्र आल्याने समर्थकांमध्ये भावनिक लाट उसळली असली, तरी शिंदे गटाकडून या एकत्र येण्यामागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक आणि सडेतोड पत्र लिहून ठाकरे गट आणि मनसेवर थेट टीका केली आहे.
मराठी भाषेच्या नावाखाली पुन्हा एकदा स्वार्थी राजकारण सुरू झालं असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे निव्वळ मुंबई महापालिकेवर डोळा ठेवून रचलेली राजकीय खेळी आहे. राज ठाकरे यांनी कधी काळी ज्या ‘बडव्यां’वर नाराजा होऊन घर सोडलं, त्यांच्याच खांद्यावर आज बसत आहेत, अशी थेट टीका सरनाईक यांनी केली आहे.
चंद्रभागेच्या तीरी उसळला लाखोंचा जनसागर; आषाढी वारीनिमित्त सुमारे 20 लाख भाविक पंढरीत दाखल
आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या आणि आपल्या संकल्पनेतून जन्म घेतलेल्या अनेक जनहित योजनांचा प्रभाव आजही राज्यभरात दिसतो. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या नावाखाली स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे, आणि म्हणूनच मनातील भावना या पत्रातून मांडाव्याशा वाटल्या.
‘मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो’ असे मनसे व उबाठा गट म्हणत आहे. पण काही वर्षांपूर्वी हेच लोक कोणाच्या हितासाठी वेगळे झाले होते? मराठी भाषा, माणूस आणि संस्कृती यांच्याविषयी त्यांना मुळातच प्रेम नाही. मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ते पुन्हा एकत्र येत आहेत, हे सुज्ञ जनता जाणून आहे. राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक मराठी लोककथा आहे, त्याप्रमाणे यांचा जीव महापालिकेच्या तिजोरीत अडकलेला आहे.
शनिवारी वरळीच्या मेळाव्यात सत्तेचा अजेंडा आणि स्वार्थाचाच झेंडा दिसला. सत्ता गेल्यामुळे ते किती अस्वस्थ झाले आहेत, हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते. उबाठाचे राजकारण हे खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे, त्यामुळेच त्यांच्या सोबतीने चालणारेही त्यांना सोडून जात आहेत.
‘मराठी’ची टोपी घालून त्यांनी महापालिकेची सत्ता उपभोगली, पण मुंबई आणि मराठी माणसांना मात्र गंडवले. कोविड काळातील खिचडीपासून ते मिठी नदीतील भ्रष्टाचारापर्यंत सर्व प्रकरणांत हे लोक अडकलेले आहेत. “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार” अशा अफवांच्या साहाय्याने जनतेची मते लाटली गेली. मराठी माणसाचा नाही तर स्वतःचाच विकास केला.
एवढी वर्षे सत्ता असूनही मराठी शाळा वाचवता आल्या नाहीत. उलट इंग्रजी शाळांमध्ये रूपांतर केले गेले. ‘पाट्यांच्या आंदोलनां’चे नेतृत्व करणाऱ्यांच्या आमंत्रणपत्रिका इंग्रजीत छापल्या गेल्या. गिरणी कामगारांचा प्रश्न, मराठी माणसाचे उपनगरांत स्थलांतर, तिसरी भाषा शिकविण्याचे धोरण – हे सगळं त्यांच्या कार्यकाळात घडलं.
मुंबईतील उद्योगधंद्यांतून मराठी माणसाला बाहेर ढकललं गेलं, आणि फक्त भाषेवर राजकारण करणारे हे नेते जनतेच्या समस्या कधी समजून घेत नाहीत. ‘चाकरमानी म्हणजे चाकर’ असा भ्रम त्यांनी पिढ्यान् पिढ्या पेरला. त्याकाळात त्यांनी खरंच काय केलं? यावर “पश्चाताप मेळावा” घेऊन जनतेला उत्तर द्यायला हवं.
मनसे स्थापन होऊन १९ वर्ष झाली, पण मराठी भाषेची अवस्था अजून बिकट झाली आहे. ज्या बडव्यांमुळे राज ठाकरेंनी पक्ष स्थापन केला, त्यांच्याच खांद्यावर आज ते बसलेत. भाषणांना टाळ्या पडतात पण मते मिळत नाहीत, हे लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी ‘शरणागती’ पत्करली?
मराठी तरुणांसाठी काय केलं त्यांनी? व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्थानिक अधिकार समित्या – हे सगळं विसरून त्यांनी केवळ आंदोलने केली आणि राजकारण फुलवलं. मराठी तरुणांना रोजगार मिळाला, तर त्यांचं दुकान बंद होईल, ही भीती त्यांना आहे.
त्यामुळेच मराठी तरुणांना भडकवायचं, आणि त्यांच्या खांद्यावर आपली राजकीय पोळी भाजायची, हेच यांचं धोरण आहे. पुन्हा एकत्र येण्यामागेही हीच भीती – की दुकान बंद होईल. आज मराठी माणसाला खरेच काय हवे आहे याचा विचार कोणी करत नाही. “मराठी-मराठी” करून राजकारण करणाऱ्यांनी स्वतःच्या सत्तेचा उपभोग घेतला. परंतु त्यांच्या काळात सामान्य माणसाचे काय झाले, हे कोणी विचारले तर उत्तर नाही. मुंबईकर आज विकासाचे राजकारण स्वीकारतो आहे.
आपण, शिंदे साहेब, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि महाराष्ट्रधर्माचे कार्य प्रामाणिकपणे पुढे नेत आहात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांवर काम करत असताना आपण जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.
कोस्टल रोड, भुयारी मेट्रो, हायवे, मेडिकल सुविधा, शेतकरी आणि महिलांसाठीच्या योजना – सर्वसामान्य माणसांच्या हिताचे निर्णय आपण घेतले. “जय जय महाराष्ट्र माझा” गीताला राज्यगीताचा दर्जा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा – ही आपली भाषा व संस्कृतीप्रेमाची ठोस उदाहरणं आहेत.
राज ठाकरेंना माजी NSG कमांडोचा सवाल; ’26/11 च्या हल्ल्याच्या वेळी तुमचे योद्धे कुठे होते?’
आपण संकटात धाव घेणारे, जमीन सोडून राजकारण न करणारे नेते आहात. काम करणारा नेता, जनतेत मिसळणारा कार्यकर्ता, आणि “मराठी मनाचा खरा राजा” – हीच आज जनतेची भावना आहे. माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांचा आपल्यावर अभिमान आहे. आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विजयाचा ध्वज अधिक उंचीवर जाईल, यात शंका नाही. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी मन आपल्याच सोबत आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.