सौजन्य - नवराष्ट्र टीम
सासवड : विधानसभा निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीचं सत्तेत राहणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महायुतीमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याच्या जोरदार हालचाली सुरु झाली आहेत. त्याच बरोबर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला कोणते खाते मिळणार याची चर्चा आहे. दरम्यान नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुरंदर हवेलीचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार विजय शिवतारे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा कार्यभार होता. यावेळी कॅबिनेट पदी वर्णी लागण्याची खात्री वर्तविण्यात येत आहे. एकूणच शिवतारे यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्याच यादीत स्थान मिळणार असल्याच्या शक्यतेने पुरंदरवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राष्ट्रवादीमधून फारकत घेतल्यानंतर २००९ मध्ये विजय शिवतारे यांनी पुरंदरमधून शिवसेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली. यामध्ये माजी आमदार संजय जगताप आणि दिगंबर दुर्गाडे यांचा पराभव केला. या काळात त्यांनी सर्वात प्रथम गुंजवणी प्रकल्पाला हात घातला होता. त्याचबरोबर पुरंदर मधील प्रशासकीय इमारत, दिवे येथील धान्य गोडाऊन, रस्ते, त्याचबरोबर जलसंधारणाच्या कामाला गती दिली होती. एखाद्या आमदाराने प्रथमच मोठ्या प्रकल्पाची घोषणा केल्याने ती पूर्ण होण्यासाठी २०१४ मध्ये पुन्हा एकदा त्यांना संधी दिली होती. यावेळी संजय जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार अशोक टेकवडे यांचाही पराभव झाला होता.
२०१४ मध्ये शिवतारे यांना भाजप- सेना सरकारमध्ये जलसंपदा आणि जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री पद तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले होते. त्या काळातही गुंजवणी बरोबरच आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, जेजुरी एमआयडीसीचे विस्तारीकरण, दिवे येथील खेळाचे मैदान, आंतरराष्ट्रीय बाजार पुरंदर उपसा हे विषय होते. यापैकी गुंजवणीचे काम पूर्ण झाले मात्र पाईपलाईन, विमानतळ हे प्रकल्प वादविवादामुळे प्रलंबित राहिले. त्यातच मंत्रीपदाचा कार्यभार असल्याने पुरंदरकडे त्यांचे दुर्लक्ष झाले, मराठा आरक्षणाबाबत सासवडमध्ये तब्बल १०० दिवस आंदोलन सुरु असताना याच तालुक्याचे मंत्री असतानाही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आणि विरोध वाढला. आणि २०१९ मध्ये संजय जगताप यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
२०१९ मध्ये संजय जगताप आमदार झाल्यानंतर सुरुवातीचे तब्बल अडीच वर्षे कोरोनात गेले. त्यानंतर पुन्हा सत्तापालट झाली आणि पुरंदर पुन्हा सत्तेच्या विरोधात आला. त्यामुळे पुन्हा एकदा विकासाला खीळ बसली. गुंजवणी आणि विमानतळ प्रकल्प जागेच्या अदलाबदलीमध्ये अडकले. नवीन प्रशासकीय इमारत श्रेयवादात अडकली. पुरंदरला निधी न मिळाल्याने संजय जगताप यांना मोठी कामे करण्यात अपयश आले. त्याच काळात विजय शिवतारे पुन्हा एकदा सक्रीय झाले आणि गुंजवणी प्रकल्प चर्चेला आला. हवेलीमधील नागरिकांचा महानगरपालिका आणि पुन्हा नगरपालिकेत समावेश करणे, मालमत्ता कर, पाणी योजना, वीर वरून सासवड मधील जेजुरीसाठी पाणी योजना, देवस्थान विकास आराखडासाठी निधीची तरतूद यावरून शिवतारे यांनी संजय जगताप यांच्या विरोधात अक्षरशः राळ उठवली.
दरम्यानच्या काळात शासनाची लाडकी बहिण योजना सुरु झाली, नाभिक समाजाला व्यावसायिक कीट वाटप, महिलांसाठी साडी वाटप करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तब्बल तीन वेळा पुरंदरला येण्यासाठी भाग पाडले. शासन आपल्या दारी उपक्रम पुरंदर मध्ये घेवून पुन्हा एकदा बाजी मारली. पूर्वीचे चर्चेत असलेले विमानतळ, गुंजवणी, बाजार प्रकल्पात आणखी लॉजिस्टिक पार्क, दिवे येथील आयटी प्रकल्प नीरा नदीतील पाणी जेजुरीच्या नाझरेत सोडून पुरंदरचा नद्याजोड प्रकल्प यांची भर पडली.
हे सुद्धा वाचा : सांगलीत मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात? ‘या’ बड्या नेत्यांची नावं चर्चेत
साहजिकच मागील पाच वर्षात समाधानकारक कामे झाली नसल्याने शिवतारे यांच्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले. त्यात ऐन निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे संभाजीराव झेंडे यांनी महाविकास आघाडीकडून काडीमोड घेत बंडाचा झेंडा फडकवला. आणि झालेल्या तिरंगी लढतीत शिवतारे यांना यश मिळाले. पुरंदर तालुका अनेक वर्षे मोठे प्रकल्प आणि विकासापासून वंचित असून, शिवतारे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. शिवतारे यांना जलसंपदा विभागात काम करण्याची इच्छा असल्याने जलसंपदा खात्याच्या कॅबिनेटसाठी आग्रह धरला असून, तेच खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास शिवतारे यांच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यास मोठा वाव मिळणार आहे. सामान्य नागरिकांनाही कुतुहूल निर्माण झाले आहे.