मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात (Rebellion) सामिल झालेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता शिवसेना नेत्यांनी संघटनात्मक पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ठिकठिकाणी गटप्रमुख (Group Leader), शिवसैनिकांच्या (Shivsainik) बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत मेळावे (Meetings) घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
आज, शनिवारी २५ जून रोजी सायंकाळी पाच वाजता लाला लजपतराय महाविद्यालयात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या शिवसैनिकांच्या मेळाव्यात वरळी, महालक्ष्मी, करी रोड भागातील शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या भागावर शिवसेनेचे चांगले वर्चस्व असून स्वत: आदित्य ठाकरे या ठिकाणचे आमदार आहेत.
तसेच, आदित्य ठाकरे हे उद्या रविवारी सकाळी ११ वाजता सांताक्रूझ पूर्व येथील पाटक टेक्निकल हायस्कूलमधील शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी कलिना आणि कुर्ला विधानसभेतील शिवसैनिकांना उपस्थित राहणार आहेत. आमदार संजय पोतनीस यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.