छ.संभाजीनगर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणूकांबाबत तयारी अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे स्पष्ट केले आहे. राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये (MVA) वाटप संदर्भात सगळे अलबेल असून बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले. तसेच संजय राऊत त्यांनी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना विष्णूचा 13 अवतार असे संबोधले असून बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता असा सवाल केला आहे.
आगामी निवडणूकांसाठी महाविकास आघाडी अॅक्शनमोडमध्ये आली आहे. संजय राऊत यांनी राज्यातील मित्रपक्षांसोबत बोलणी झाल्याचे स्पष्ट केले आहे, संजय राऊत म्हणाले, “सर्व पक्षांसोबत बोलणी चालू असून महाविकासआघाडीतील जागावाटप फॉर्म्युला हे तिन्ही पक्षांचे प्रमुख जाहीर करतील, आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती जाहीर केली आहे. मविआने शिवसेनेला प्रकाश आंबेडकर सोबत चर्चा करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हे मविआचा घटकच आहेत. प्रकाश आंबेडकर आमच्या या आघाडीत नवे आहेत मात्र ते देशाचे नेते आहेत. तसेच आमच्या आघाडीतील काँग्रेस मोठा पक्ष आहे. काँग्रेस वाढलं पाहिजे.”अशी भूमिका संजय राऊत यांनी आगामी निवडणूकांबाबत व्यक्त केली आहे.
तसेच राऊत यांनी मोदी सरकार व महायुती सरकारवर देखील निशाणा साधला आहे. 2024 ला देशात व राज्यात परिवर्तन होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करत ईव्हीएम बद्दल लोकांमध्ये संशय निर्माण झाल्याचे सांगितले आहे. राऊत टीका करताना म्हणाले, “देशात 19 लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो.ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले. ईव्हीएम मशीन शिवाय भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही. ईव्हीएम माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. मोदी विष्णूचे 13 वे अवतार आहेत मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरतात? कारण अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला 33 कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाही” अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केला आहे.