मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला धक्का देणारा ठरला. देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपलाफटका बसला आहे. मित्रपक्षांच्या सहाय्याने एनडीए आघाडी सरकार स्थापन करणार की इंडिया आघाडी सरकार स्थापन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही आघाडींच्या मित्रपक्षांची आज दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. दरम्यान, राज्यामध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. मोदींची गॅरंटी लोकांनीच संपवली असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
मोदींची गॅरंटी लोकांनी संपवली
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. खासदार राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी भगवान यांचा पराभव झाला आहे. मोदींची गॅरंटी लोकांनी संपवली. भाजपला बहुमत मिळाले नाही. चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांच्या जीवावर सरकार उभं आहे. पण ते कधीही जाऊ शकतात. आम्ही 250 च्या जवळ आहोत. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांनी ठरवलं आम्हाला हुकुमशाह बरोबर जायचं नाही. अमित शाह यांना जास्त लीड मिळाला. पण राहुल गांधी यांची लीड जास्त आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदावरुन मतभेद नाही
त्याचबरोबर इंडिया आघाडीने सरकार स्थापन केले राहुल गांधी पंतप्रधान होणार का या प्रश्नाचे देखील संजय राऊत यांनी उत्तर दिले. खासदार राऊत म्हणाले, “जर राहुल गांधी हे नेतृत्व स्वीकरण्यासाठी तयार असतील तर आम्ही विरोध का करु. ते देशाचे नेते आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे. राहुल गांधी हे लोकप्रिय नेते असून देशवासियांनी त्यांना स्वीकारले आहे. आम्ही सगळे त्यांच्यावर प्रेम करतो. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत कोणतेही मतभेद नाहीत. आम्हाला सत्ता पाहिजे म्हणून आम्ही ही लढाई लढलेलोच नाही. आम्ही संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी लढलो. आणि ही जी इस्ट इंडिया कंपनीसारखी तानाशाही सुरु असून लुटमार सुरु आहे त्याच्याविरोधात ही लढाई लढलो. नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी मान्य केले पाहिजे की ते हारले आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.