श्रीकांत शिंदेंची आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानवर सडकून टीका (फोटो सौजन्य-X)
Shrikant Shinde News in Marathi: भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो. भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो तर पाकिस्तान दहशतवादाचे मार्ग तयार करतो, भारत चंद्रयान आणि इतर उपग्रह प्रक्षेपित करतो, तर पाकिस्तान आपल्या भूमीवरून इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवतो. अशी परखड टीका करत शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आतंरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला लक्ष्य करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. तर गेल्या अनेक दशकांपासून भारताने दहशतवादी हल्ले सहन केले आहे. मात्र आता भारत दहशहतवाद सहन करणार नाही. प्रत्येक दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा देखील खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाकिस्तानला दिला.
यूएईच्या यशस्वी दौऱ्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नुकताच काँगो लोकशाही प्रजासत्ताक देशाचा दौरा केला. यावेळी त्यांनी काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठका देखील पार पडल्या.
काँगो प्रजासत्ताक दौऱ्यात राजकीय नेतृत्वासोबत अनेक उच्चस्तरीय बैठकांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ज्याँ-पियरे बेम्बा गोम्बो, उपपंतप्रधान व परिवहन मंत्री, थेरेस कायिकवांबा वाग्नर, परराष्ट्र, आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री, व्हायटल कामेरे ल्वा कन्यिगिन्यी एनकिन्गी, लोकसभेचे अध्यक्ष, ज्याँ-मिशेल समा लुकोन्दे क्येन्गे, सिनेट अध्यक्ष यांच्या समवेत पहिल्या दिवशी बैठका पार पडल्या. या बैठकीदरम्यान काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी या दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसाचाराचं समर्थन करता येणार नाही, हे स्पष्ट केले. त्यांनी दहशतवादाच्या जागतिक संकटाविरोधात लढण्याची कटिबद्धता व्यक्त केली आणि भारतासोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
परराष्ट्र राज्यमंत्री श्रीमती थेरेस वाग्नर यांनी भारताने सीमापार दहशतवादासंदर्भातील माहिती दिल्याबद्दल आभार मानले. भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात काँगो प्रजासत्ताक पूर्णपणे पाठिशी आहे, आणि जागतिक व्यासपीठांवर, जिथे काँगो सदस्य आहे, तिथे भारताचा संदेश पोहोचवण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. त्यांचे लोकसभेचे अध्यक्ष व्हायटल कामेरे यांनी भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि काँगोच्या जनतेने भारताच्या वेदनेत सहभाग असल्याचे सांगितले. त्यांनी भारताच्या प्रयत्नांना काँगो लोकसभेच्या वतीने पाठिंबा दिला. तर सिनेट अध्यक्ष ज्याँ-मिशेल समा लुकोन्दे यांनी सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढा आणि शांततेचा ध्यास हे भारत आणि काँगो प्रजासत्ताकचे समान ध्येय आहे. जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात एकसंघ आवाज उठवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांकडून मिळालेल्या सहवेदनेबद्दल भारत सरकार आणि जनतेतर्फे आभार मानले. त्यांनी भारताचा दहशतवादाविषयी “शून्य सहिष्णुता”चा निर्धार पुन्हा व्यक्त केला आणि ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने दिलेले चोख प्रत्त्युत्तर याबाबत मत व्यक्त केले. तसेच, दहशतवादाच्या सर्व प्रकारांविरुद्ध जागतिक सहकार्य वाढवणे हे भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.
या बैठका झाल्यानंतर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने काँगोमधील भारतीय समुदायासोबत संवाद साधला. ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका यावर चर्चा झाली. काँगोतील भारतीय समुदायाच्या योगदानाबद्दल प्रतिनिधी मंडळाने विशेष कौतुक व्यक्त केले आणि द्विपक्षीय संबंध दृढ होण्यास त्यांच्या भूमिकेचे महत्त्व मान्य केले. भारताच्या सीमापार दहशतवादाविरोधी नव्या संघर्ष धोरणाच्या पार्श्वभूमीवर काँगो दौर्याचे ही यशस्वी मोहीम भारताच्या धोरणात्मक भूमिकेचा प्रभावी संदेश देणारे ठरले आहे.