श्रीवर्धन तालुक्यातील गृप ग्रामपंचायत कार्यालय-दिघी अंतर्गत दिघी कोळीवाड्यातील ८ वर्षीय निरागस बालिकेवर दिघी कोळीवाड्यातीलच ४० वर्षीय नराधमाकडून बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला दिघी सागरी उपनिरीक्षक हनुमंत शिंदे यांनी अटक केली आहे.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार आणि दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर प्रथम खबरी अहवालानुसार (एफआय आर) दि ३०/०१/२०२४ रोजी रात्री ०७:३० ते ०९:०० या वेळेत दिघी कोळीवाड्यातील ८ वर्षीय बालिकेच्या निरागसतेचा गैर फायदा घेत दिघी कोळीवाड्यातीलच ४० वर्षीय नराधमाकडून बालिकेला जबरदस्तीने घेऊन जाऊन निरागस बालिकेवर बलात्कार करण्यात आला आहे. याविरोधात पिडितेच्या नातेवाईकांनी दिघी सागरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिताच्या कलम ३७६ (२), ३७६ (३), ३७६ AB, ३६३ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ च्या कलम ४, ६ आणि ८ अनुसार गुन्हा ( प्रथम खबर क्रमांक ००८, वर्ष : २०२४ ) दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने दोन फेब्रुवारी पर्यंत कोठडी सुनावली असुन पुढील तपास दिघी सागरी पोलीस करीत आहेत.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात आठ वर्षीय बलिकेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडत असताना महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. या घटनेकडे पाहता तालुक्यातील महिला व मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्याची कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला तरी महिला मुलींवरील होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे. आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेमुळे सामाजिक चिंता वाढली आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करूनही कायद्याची समाजात भीती नाही. गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याकरिता सरकारी यंत्रणेने कंबर कसून पीडित मुलीला न्याय मिळवून द्यावा याकरिता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे गांभीर्याने लक्ष देणार का? याकडे श्रीवर्धन तालुक्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकिय अहवाल प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण प्रकाराचा खुलासा होईल असे दिघी सागरी पोलिसांचे म्हणणे आहे.
पिडितेला न्याय मिळावा यासाठी दिघी कोळीवाड्यातील शेकडो महिला रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर आरोपीस जास्तीत जास्त सजा देण्याची मागणी सुद्धा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित शासकिय यंत्रणांनी आणि धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे लाडके शिष्य आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी भाऊ म्हणून आम्हा महिलांच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन शासन दरबारी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. पंचक्रोशीमध्ये संध्याकाळी ०६:०० वाजता नंतर ते सकाळी ०६:०० वाजेपर्यंतच्या पोलीसांच्या गस्तीचे प्रमाण वाढवण्याची मागणी करून सदर घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत पिडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत दिघी कोळीवाड्यातील सर्व महिला पिडितेसह पिडितेच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
तसेच जोपर्यंत पिडितेस न्याय मिळत नाही तोपर्यंत पिडितेस आणि पिडितेच्या कुटुंबियांवर कोणीही कोणत्याही प्रकारे दबाव तंत्राचा, धमकी तंत्राचा अवलंब करण्यासह इतर कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारे सदर घटना, गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू तदर्थ नराधमांची आणि नराधमांना पाठिशी घालणाऱ्या कोणत्याही समाजकंटकांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. नराधमांना आम्ही आमच्या पद्धतीने अद्दल घडवू अशा इशारा दिघी कोळीवाड्यातील महिलांनी दिला आहे.