संग्रहित फोटो
नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीमार्फत (Smart City) महापालिका अंतर्गत शहरातील गावठाण भागात 24 तास पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. महापालिकेच्या 24 तास पाणी मिळण्याचा हा प्रकल्प खरंतर खूप महत्त्वकांक्षी आहे. तथापि, महापालिका आणि स्मार्ट सिटी यांच्यात समन्वय नसल्यामुळे व स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही योजनाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, या कामाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल (Rajendra Bagul) यांनी केली आहे.
या योजनेकरता पाणी साठवण्यासाठी विविध क्षमतेचे जलकुंभ व त्यानंतर त्याला जोडल्या जाणाऱ्या जलवाहिन्या अशी वितरण व्यवस्थेची सांगड घालायला हवी होती. ज्या पाण्याच्या जलवाहिन्या कार्यान्वित आहे त्याचे काय करायचे तसेच गल्लीबोळात असलेले रस्ते परत खोदून अस्तित्वात असलेल्या लाईन पुन्हा टाकून पुन्हा नवीन रस्ते व लाईनचा अतिरिक्त खर्चाचा बोजा वाढवण्यात आलेला आहे. नाशिक महापालिकेच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्यांमध्ये सदरच्या वितरण व्यवस्थेच्या लाईन टाकण्यास महापालिकेने परवानगी दिलेली आहे. तथापि, महापालिकेचा सक्षम अधिकाऱ्यांच्या कोणताही सहयोग व लेखी परवानगी न घेता स्मार्ट सिटी कंपनीने मोठ्या प्रमाणावर काँक्रीटचे रस्ते वाटेल तसे फोडून हे शहर विद्रूप केले.
महापालिकेने स्मार्ट सिटीबाबत जबाबदारी निश्चित करावी
शिवाजीरोडवरील रायझिंग मेन लाईनला स्मार्ट सिटीला परवानगी नसताना देखील त्यांनी अनेक कनेक्शन महापालिकेच्या परवानगीशिवाय वितरीत केले आहेत. त्याची जबाबदारी महापालिकेने स्मार्ट सिटीबाबत निश्चित केली पाहिजे व त्यापोटी महापालिकेने झालेले आर्थिक नुकसान दंडात्मक कारवाईसह संबंधितांकडून वसूल करावे, अशी सूचना बागूल यांनी केली.