सोलापूर : केस टाकील, कारखाना सील करीन, अटक करीन, मागच्या केसेस बाहेर काढेन असं म्हणतात. फक्त धमकीचे राजकारण सुरु आहे. त्यांचे मोठे मोठे नेते अशी धमकी देत आहेत. महाराष्ट्र चालवा. इतके धमकी काय देत बसलायत. सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, हे चार हुतात्म्यांचं शहर आहे, असा इशारा सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.
उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापुरात आठ दिवसात पाणी मिळतं त्याचं पाप भारतीय जनता पार्टीचा आहे. स्मार्ट सिटी बनवायचं नुसतं नाटक केलं. एक दिवशी महाराष्ट्र ही गुजरातला चालवायला देतील. मतांची किंमत भाजपाला राहिली नाही. सोलापूर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. असं प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
भाजपचा खासदारांनी खासदारकी वाया घालवली
प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजपचा खासदारांनी खासदारकी वाया घालवली. त्यांच्याकडे जनमत नाही मात्र गेल्या तीन दिवसापासून सोलापुरात नेत्यांना धमक्या येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी वीस हजार लोक फक्त. हे वाईट वाटतं आमच्या गड्डा यात्रेला त्यापेक्षा जास्त गर्दी असते.
आयटी पार्क सोलापुरात आणणार आहे
पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या, पाचशे गावाकडून मी आले आहे. एक लढाई माझ्यासोबत लढा. पुढची लढाई मी लढायला समर्थ आहे. पहिली प्रतिज्ञा सोलापूर दुष्काळमुक्त करणार आहे. दुसरी शपथ खड्डे मुक्त सोलापूर करणार आहे. तिसरी शपथ आयटी पार्क सोलापुरात आणणार आहे, अशा पाच ते सहा शपथ आज मी घेत आहे.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. बाबासाहेबांनी सेक्युलर घटना दिली आहे. सर्व धर्म समभाव ही भावना त्यावेळेस होती. हुकूमशाही विरोधात लोकशाही अशी लढाई आहे. सोलापूर हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे. सोलापुरात आम्ही हुकुमशाही येऊ देणार नाही. असं शिंदे म्हणाले.