अरुंद रस्त्यामुळे एसटी बसचे चाक रूतले (फोटो सौजन्य-X)
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या पेंढरी परिसरातील मुख्य मार्गाची दैनावस्था झाली आहे. पावसाळ्यात तर या मार्गाची वाट अधिकच बिकट झाली आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना कमालीचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अशातच बुधवारी (दि. २०) या खराब व अरुंद रस्त्यामुळे अहेरी-जारावंडी-पेंढरी मार्गे गडचिरोलीकडे जाणारी एसटी पेंढरी गावालगत रस्त्यातच रुतली. यामुळे या मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली होती.
यादरम्यान प्रवाशांसह या परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. या प्रकारामुळे या परिसरातील दयनीय रस्त्यांची गंभीर समस्या पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास अहेरी आगारातून अहेरी-कसनसूर-जारावंडी-पेंढरी मार्गे गडचिरोलीकडे धावणारी बस निघाली. पेंढरी गावाजवळ खराब तसेच अरुंद रस्त्यामुळे बस चिखलात अडकली. मुख्य रस्त्याच्या कडेला बस अडकून पडल्याने या मार्गावरील चारचाकी वाहनांची वर्दळ ठप्प पडली होती.
परिणामी, वाहतूकदारांना कमालीचा मनःस्ताप सहन करावा लागला. एवढेच नव्हे तर या मार्गे एसटीने प्रवास करणाऱ्यांचीही प्रचंड गैरसोय झाली. पावसाळ्यात दरवर्षी ही समस्या उद्भवते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अरुंद आणि जीर्ण रस्त्यामुळे वाहने अनेकदा घसरून अडकतात.
स्थानिक लोक आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे. निवडणुकीच्या काळात नेते हात जोडून मते मागतात. परंतु, पाऊस पडल्यानंतर या रस्त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही येत नाही. जनतेला दररोज समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याचा आरोप या परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने लक्ष देत रस्त्याच्या रुंदीकरणासह पक्के खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
भंगार बसेसचाही ससेमिरा सुटेना
धानोरा तालुक्यातील पेंढरीसह एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसर अतिदुर्गम क्षेत्रात मोडत असून या भागातील रस्त्यांची दयनीय स्थिती आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होऊन बसले आहे. या परिसरातील बहुसंख्य नागरिक प्रवासासाठी एसटीला प्राधान्य देतात. मात्र, महामंडळाद्वारे या मार्गावर भंगार बसेस सोडल्या जात आहेत.