दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रकरण (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचा ससून रुग्णालयाच्या उच्च स्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात कोणी दोषी असेल तर कारवाई केली जाणार आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. पुण्यात पत्रकारांशी त्या बोलत होत्या. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणात दोन चौकशी अहवाल प्राप्त झाले आहेत.
उद्या (दि. १५ मंगळवारी) ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीच अहवाल प्राप्त होणार आहे. यासंदर्भात चाकणकर म्हणाल्या, ‘मृत महीला तनिषा भिसे हिची खासगी माहिती रुग्णालयाकडून सार्वजनिक करण्यात आली आहे. याबाबत अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार देखील भिसे कुटुंबाकडून देण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला जात आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. पुढे कोणावरही असा प्रसंग ओढवू नये याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.’
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय असल्याने धर्मदायुक्तांचा अहवाल असणे गरजेचे आहे. माता मृत्यू असल्याने माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असणे देखील गरजेचं आहे. तात्पुरत्या स्वरूपातील कोणतीही कारवाई होणार नाही, असे चाकणकर म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात धर्मादाय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला चौकशी अहवाल दि.८ एप्रिल रोजी विधी व न्याय विभाग, मंत्रालय यांना सादर केला असून विभागाने अहवाल मा.मुख्यमंत्री यांना सादर केला आहे.आज दि.११ एप्रिल रोजी पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आला आहे.या दोन्ही चौकशी अहवालावर राज्य शासन तातडीने कारवाई करावी अशी राज्य महिला आयोगाची मागणी आहे.
‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ परिसरात जमावबंदी
गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून आंदोलने होत आहेत. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण असते. यापार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी या परिसरात जमावबंदीचे आदेश काढले आहेत. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोर विविध राजकीय पक्ष तसेच संस्था व संघटनांकडून रुग्णालयाबद्दल विरोध केला जात आहे. रुग्णालयाच्या दारात आंदोलन केले जात आहे. आंदोलनात नावाला काळे फासणे, शाई फेकने, चिल्लर फेकण्याच्या घटना घडल्या. तर, रुग्णालयाच्या टेरेसवर जाऊन आंदोलन करण्यात आले. यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांनाही याचा त्रास होतो. सोबतच परिसरात गर्दी होते. परिणामी वाहतूक कोंडीही होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी दीनानाथ रुग्णालय परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिले.
https://youtu.be/XiFuXMN5D