माळेगाव : माळेगाव पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान संशयास्पद चारचाकी वहानाची तपासणी केली असता या गाडीत अवैध गावठी दारू आढळून आली या कारवाईत दौंड तालुक्यातील दोन आरोपीसह ५ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कामगिरीमुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज रात्री गस्त घातली जात आहे. पोलिस उपनिरीक्षक देविदास साळवे हे पोलिस हवालदार जयसिंग कचरे, संदीप वाघमोडे, अमोल कोकरे राजहंस चौक येथे गस्त घालत असताना एका पांढऱ्या रंगाची संशयास्पद चारचाकी गाडी आढळून आली. या गाडीला थांबवण्याचा इशारा करीत असताना दोन व्यक्ती ही गाडी सोडून पळून गेले.
पळुन चाललेल्या दोन आरोपींना उपनिरीक्षक तुषार भोर, पोलिस कॉन्स्टेबल अमजद शेख, अमोल राऊत यांनी ताब्यात घेतले. भाऊ बापू चव्हाण, प्रभाकर साधु साळुंके (दोघेही रा. राहु पिंपळगाव ता. दौंड जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलीस हवालदार जयसिंग कचरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चारचाकीमध्ये ५६ हजार रुपयांची ३५ लिटर मापाच्या १६ प्लास्टिक कॅनमधे ५६० लिटर गावठी हातभट्टीची दारु आढळून आली. या आरोपींना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.
[blockquote content=”माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दररोज रात्री गस्त घातली जात आहे. संशयास्पद वहाने तपासली जात आहेत. परिसरातील सर्व अवैधधंद्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल.” pic=”” name=”- बालाजी भांगे (सहायक पोलिस निरीक्षक)”]