पुणे : पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (Film and Television Institute of India) चे विद्यार्थी कॅम्पसमध्ये बेमुदत उपोषणाला (Indefinite Hunger Strike) बसले आहेत. हे विद्यार्थी 2020 बॅचचे असल्याची माहिती दिली जात आहे. हे सर्व विद्यार्थी सोमवारी संध्याकाळपासून कॅम्पसमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. एका विद्यार्थ्याला त्यांच्या बॅचमधून काढून टाकल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
याबाबत एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलं की, ’10 एप्रिल 2023 रोजी कळवण्यात आले की, 2020 बॅचच्या 5 विद्यार्थ्यांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संस्थेतून काढून टाकण्यात आले आहे. 5 पैकी 4 विद्यार्थ्यांची हकालपट्टी नंतर मागे घेण्यात आली असली तरी एका विद्यार्थ्यावर केलेली कारवाई कायम ठेवण्यात आली आहे. पण सध्या एका विद्यार्थ्याला संस्थेने काढलं आहे. त्यामुळे त्याची हकालपट्टी रद्द करावी, यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
विद्यार्थ्याला करण्यात आलं बहिष्कृत
ज्या विद्यार्थ्याला बहिष्कृत करण्यात आले होते तो विद्यार्थी अनेक काळापासून मानसिक आरोग्याने त्रस्त होता. त्याला काही समस्या देखील होत्या. पण त्याने विनंती करूनही प्रशासनाने समस्येकडे लक्ष दिले नाही. 5 पैकी 4 जणांवरील कारवाई मागे घेण्यात आली. आताही कोणताही भेदभाव न करता त्यालाही परत घेण्यात यावे, अशी मागणी असल्याचे एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने सांगितले.