राष्ट्रवादींच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरेंचा शरद पवार गटाला सवाल
Karad News: महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आणि देशाला गतिमान करण्यासाठी भाजपा व मित्रपक्षांच्या एनडीएच्या माध्यमातून राज्यात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सामूहिकरित्या घेतला असून, ही भूमिका पुढे नेणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. विशेषतः ‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार?’ याबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्याशिवाय या विषयावर चर्चा होऊ शकत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अजितदादांच्या नेतृत्वाखाली आधीच निश्चित असून, त्याच मार्गाने वाटचाल करणे, हे आमचे कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील वेणूताई चव्हाण स्मारकास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याचवेळी माध्यमांशी संवाद साधताना तटकरे बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपने ‘गिळंकृत’ केल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी, अशा टीका-टिप्पण्यांना फारसे महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीए सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभा निवडणुकीत १३ कोटी जनतेने या भूमिकेला कौल दिला आहे. त्यामुळे एनडीएसोबत जाण्याची भूमिका आधीच स्पष्ट असल्याचे सांगितले.
शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिल्यानंतर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया का नाही? या प्रश्नावर तटकरे यांनी, विलीनीकरणाबाबत कोण काय प्रतिक्रिया देतो, यावर बोलणार नाही. मात्र कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार, याचा खुलासा आधी झाला पाहिजे. त्यानंतरच यावर स्पष्ट भूमिका मांडता येईल, असे मत व्यक्त केले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊ नयेत, यासाठी कट रचला जात असल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर तटकरे यांनी, तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. आधी काँग्रेसने चंद्रपूरचा महापौर कोणाचा होतोय ते पाहावे. काँग्रेसमध्येच पळवा-पळवी सुरू असताना वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला.
शपथविधीस शरद पवार व सुप्रिया सुळे यांना आमंत्रण नव्हते? या आरोपांवर तटकरे यांनी, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाने एकमताने सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर केले होते आणि त्यानुसारच शपथविधी पार पडल्याचे सांगितले.
या सर्व घडामोडींमध्ये आपण आणि प्रफुल्ल पटेल ‘खलनायक’ ठरत असल्याचा आरोप फेटाळताना सुनील तटकरे म्हणाले, भाजप हा देशातील प्रमुख पक्ष असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या सहमतीने सत्तेत सहभागी आहे. भाजपाने कधीही आमच्या पक्षाचे निर्णय ठरवलेले नाहीत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र भूमिका घेणारा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणावर योग्य वेळी बोलू
आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून ४१ जागांवर विजयी झालो असून, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्ष मजबूत आहे. नेता निवडीचा अधिकार हा केवळ निवडून आलेल्या सदस्यांनाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विलीनीकरणासंदर्भात यापूर्वी झालेल्या चर्चा पुराव्यांसह समोर आणण्याच्या दाव्यावर बोलताना, वेळ आल्यावर योग्य वेळी या विषयावर भूमिका मांडली जाईल, असे तटकरे यांनी सांगितले.
दुर्घटनेमागील सत्य समोर यावे
दरम्यान, अजितदादांच्या विमान दुर्घटनेबाबत व्यक्त होत असलेल्या संशयांवर तटकरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानेही चौकशी सुरू केली असून, ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या दुर्घटनेमागील सत्य महाराष्ट्र व देशातील जनतेसमोर आले पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






