सौजन्य - सोशल मिडीया
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण जुलै २०२३ पासूनच या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात उत्तर देत विषय संपवला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळेंनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी ‘कळेल’, असं एका शब्दात उत्तर दिलं. तसंच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवारांनी चूक मान्य केली
सुप्रियाच्या विरोधात मी सुनेत्राला उभं करायला नको होतं म्हणत अजित पवार यांनी चूकही मान्य केली. “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं.” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आता या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंना अजित पवारांना राखी बांधणार का? हा प्रश्न विचारला गेल्यानंतर त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं आहे.






