पुणे : पुण्यातील हायप्रोफाईल पोर्शे कार अपघातात (Porsche Car Accident) प्रकरणात पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल करत या अल्पवयी न मुलाच्या आजोबाला बेड्या ठोकल्या आहेत. सुरेंद्रकुमार अगरवाल (वय 74) असे अटक करण्यात आलेल्या आजोबाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात चालक गंगाधर पुजारी यांनी तक्रार दिली आहे. भा.दं.वि. कलम 365, 368 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री अपघातावेळी पोर्शे कारमध्ये एकूण 4 जण होते. त्यात गाडीचा चालक देखील होता. अपघात झाल्यानंतर हे सर्व पोलीस ठाण्यात गेले. अगरवाल कुटुंब देखील त्याठिकाणी आले. त्यांनी चालक गंगाधर याला तूच गाडी चालवत होता, असे सांग म्हणण्यात आले होते.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या तपासात गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले होते. त्या तपासात चालक गंगाधर याला मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार यांनी तूच गाडी चालवत होता, असे सांगण्यासाठी दबाव आणला. तर त्याला एक गिफ्ट देतो म्हणून घरी नेले. त्यानंतर त्याचा मोबाईल काढून घेत घरात डांबून ठेवले. ‘तूच गाडी चालवत होता’, असे कबूल कर म्हणून दोघांनी त्याच्यावर दबाव आणला होता, हे समोर आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी चालक गंगाधर यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून घेत आजोबा सुरेंद्रकुमार याला अटक केली आहे. विशाल हा पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा ताबा पुणे पोलीस आज घेण्याची शक्यता आहे. बहुचर्चित अपघातप्रकरणात मात्र दररोज नवनव्या घटना बाहेर येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळताना दिसत आहे.
पोलीस निरीक्षकासह कर्मचारी निलंबित
येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि रात्र पाळीवर ड्युटीला असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी तपासात ढिसाळपणा केला. हयगय केली. तसेच या अपघाताची माहिती नियंत्रण कक्ष व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही, यामुळे निलंबित करण्यात आले आहे.