पवित्र पोर्टलअभावी पालिका शाळांना शिक्षक मिळेना! १२०० शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडल्याने लाखो विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे मोठे दावे केले जात असतानाच, दुसरीकडे मात्र शिक्षक भरतीचा पुरता बोजवारा उडाला आहे. राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’च्या अत्यंत संथ आणि ढिसाळ कारभारामुळे मुंबई महापालिका शाळांमधील सुमारे १,२०० शिक्षकांची भरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार शिक्षकांची सर्व भरती केवळ या सर्वसमावेशक शासकीय पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक असल्याने महापालिका प्रशासनाचे हात पूर्णपणे बांधले गेले आहेत. पालिकेने आपला भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला असला, तरी तिथून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. परिणामी, शासन आणि प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या टांगती तलवार निर्माण शैक्षणिक भवितव्यावर आता झाली आहे.(फोटो सौजन्य – istock)
राज्यातील ‘त्या’ शिक्षकांना बसणार मोठा फटका; वेतनातच केली जाणार कपात
पवित्र पोर्टलच्या या विळख्यामुळे महापालिका प्रशासनासमोर आता दुहेरी पेच निर्माण झाला असून, हा तिढा अधिकच जटील बनला आहे. जर पवित्र पोर्टलद्वारे नियमित आणि कायमस्वरूपी भरती प्रक्रिया सुरू झाली, तर सध्या तात्पुरत्या स्वरूपात राबणाऱ्या या कंत्राटी शिक्षकांचे काय करायचे, हा मोठा प्रश्न पालिकेसमोर आहे. तर दुसरीकडे, *आम्ही कठीण काळात शाळांचा गाडा सांभाळल्यामुळे आम्हालाच पालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, र अशी आग्रही मागणी या कंत्राटी शिक्षकांनी लावून धरली आहे.
महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी या गंभीर परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आम्हाला १,२०० शिक्षकांची भरती तातडीने करायची आहे, पण पवित्र पोर्टलच्या तांत्रिक प्रक्रियेमुळे आमचे हात अडकले आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. तसेच या समस्येबाबात लवकरच राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार आहोत. पोर्टलच्या शासकीय प्रक्रियेला जर असाच वेळ लागणार असेल, तर महापालिकेला स्वतःच्या स्तरावर थेट भरती करण्याची विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत, असे शिरवडकर यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांची पदे मोठ्या संख्येने रिक्त राहिल्याने शाळांमधील शिक्षणाचा गाडा हाकण्यासाठी महापालिकेने ‘तासिका मानधन’ तत्त्वावर खाजगी शिक्षकांची कंत्राटी पद्धतीवर तात्पुरती नियुक्ती केली आहे. मात्र, या कंत्राटी शिक्षकांमध्येही सध्या तीव्र असंतोष पसरला आहे. या शिक्षकांना तासाला केवळ १५० रुपये इतके तुटपुंजे मानधन मिळत असल्याने, रआजच्या या प्रचंड महागाईच्या काळात १५० रुपयांच्या दराने शिकवणे कसे परवडणार? र असा संतप्त सवाल हे शिक्षक उपस्थित करत आहेत. यावर तात्पुरता पर्याय म्हणून रमहापालिकेने मानधन वाढीचा एक प्रस्ताव तयार केला असून, त्यानुसार या शिक्षकांना दिले जाणारे मानधन वाढवण्यात येईल, र अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. परंतु, या प्रस्तावावर अद्याप अंतिम मोहर उमटलेली नाही, तसेच मानधनात नेमकी किती वाढ होणार, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही.






