मुंबईतील वृक्षगणनेच्या 'डेटा' देखभालीत घोटाळा? 'सार्क आयटी'ला दिले झुकते माप, प्रकरण न्यायालयात जाण्याची दाट शक्यता
मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष गणनेच्या डेटा देखभालीचे कंत्राट केवळ एकाच विशिष्ट कंपनीला देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला आहे. याप्रकरणी मेसर्स सार्क आयटी रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा दावा करत दौंडकर यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. निविदा प्रक्रियेतील अनेक संशयास्पद बाबींवर बोट ठेवताना, तात्काळ चौकशी न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)
Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पुराव्यांसह पालिका प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या आरोपानुसार, २१ जून २०१८ रोजी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून अत्यंत घाईघाईने आणि कमी कालावधीची निविदा काढण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आणि वाढीव दरांचा मोठा घोळ समोर आला आहे. सार्क आयटी कंपनीने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्यान अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात पुढील पाच वर्षांसाठी प्रति झाड ९.०० रुपये दराने काम करण्याची लेखी तयारी दर्शवली होती. असे असतानाही, नवीन निविदेमध्ये मूळ किमतीपेक्षा सुमारे २५ टक्के बजेट वाढवून हे कंत्राट तब्बल १,६८,१०,३३० रुपये (१ कोटी ६८ लाख) एवढ्या मोठ्या रकमेला मंजूर करण्यात आले. पूर्वी कमी दरात काम करण्यास तयार असलेल्या कंपनीला वाढीव दराने कंत्राट देणे म्हणजे जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप दौंडकर यांनी केला आहे.(फोटो सौजन्य – AI)
मात्र, अंतिम मंजुरीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी तब्बल ६ महिन्यांचा काळ लागला. जर काम सुरू करण्यासाठी पुढे एवढा वेळ लागणार होता, तर मग पालिकेने नियमित निविदा प्रक्रिया का राबवली नाही, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.याशिवाय, निविदेमध्ये सुरुवातीला पूर्वी वृक्षगणनेचे काम केलेल्या कंपनीलाच हे कंत्राट दिले जाईल’ अशी पूर्वग्रहदूषित अट घालण्यात आली होती, ज्याचा थेट फायदा फक्त ‘सार्क आयटी’ कंपनीलाच झाला.
या घोटाळ्याचे धागेदोरे थेट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात असल्याचा संशय असून, सार्क आयटी कंपनीचे संचालक पालिकेच्या उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात नियमितपणे वावरत असल्याचे पालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होऊ शकते, असे दौंडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.या प्रकरणात सह-आयुक्त, उद्यान अधीक्षक, वृक्ष अधिकारी आणि तत्कालीन पालिका आयुक्त व वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष यांनी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाई न झाल्यास या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे संतोष दौंडकर यांनी स्पष्ट केले आहे.
या कंत्राटासाठी एकूण दोनच अर्ज आले होते, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची आर्थिक क्षमता असलेली ‘मेसर्स कॉन्सेप्ट कम्युनिकेशन्स प्रा. लि.’ ही कंपनी तांत्रिक निकष पूर्ण न केल्यामुळे अपात्र ठरली. दौंडकर यांच्या मते, ही कंपनी केवळ निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक आणि कायदेशीर दिसावी म्हणून उभी केलेली एक ‘डमी’ कंपनी होती. सार्क आयटीला कंत्राट मिळवून देणे हा आधीच ठरलेला कट होता, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.






