कळमनुरी बायपासजवळ भर रस्त्यातच 'बर्निंग टेम्पो'चा थरार; प्लायवूडसह टेम्पो जळून खाक (File Photo : Fire)
हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यात हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी बायपासजवळ प्लायवूड घेऊन जाणाऱ्या टाटा एस वाहनाचा बर्निंग थरार या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी अनुभवला. या वाहनातील प्लायवूडसह संपूर्ण वाहन जळून खाक झाले.
इंदूर येथून एका टाटा एस वाहनामध्ये प्लायवूड भरून नांदेड येथे आणले जात होते. बुधवारी (दि.23) सायंकाळच्या सुमारास वाहन नांदेडकडून जालन्याकडे निघाले होते. कळमनुरी मार्गे समृद्धी महामार्गाने प्रवास करण्याच्या उद्देशाने चालकाने वाहन कळमनुरी मार्गे आणले होते. हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी बायपासजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास वाहन आले असताना अचानक वाहनाच्या पाठीमागील भागातून धूर निघू लागला.
हेदेखील वाचा : अखेर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांची होणार घरवापसी; सरकारने जाहीर केली यादी
काही वेळातच मोठी आग भडकली. वाहनामध्ये प्लायवूड असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. वाहनाच्या पाठीमागील संपूर्ण भाग आगीने वेढला गेला. चालक व क्लिनर यांनी वाहनातील कागदपत्रे ताब्यात घेऊन बाजूला गेले.
एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात
वाहन चालकाने या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले होते. कळमनुरी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये वाहनातील प्लायवूड व संपूर्ण वाहन जळून खाक झाले.
कोणतीही जीवितहानी नाही
सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी टाटा एस वाहनाच्या बर्निंगचा थरार अनुभवला. सदर वाहन जळीत प्रकरणात कळमनुरी पोलीस ठाण्यात रात्री नोंद करण्यात आली आहे.