Latur Municipal corporation: अजेंडातील त्रुटींवरून लातूर मनपात तणाव; सत्ताधारी-विरोधकांचा प्रशासनावर हल्लाबोल
Latur Municipal corporation: लातूर शहर महानगरपालिकेची मंगळवारी झालेली पहिली विशेष सर्वसाधारण सभा विविध मुद्यांवरून चांगलीच गाजली. स्थायी समिती व परिवहन समिती सदस्यांची निवड, स्वीकृत सदस्यांची नियुक्ती तसेच सभागृहातील सुविधांच्या अभावाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. महापौर शहर जयश्री सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होण्यापूर्वीच प्रशासनाने तयार केलेल्या अजेंडा पत्रिकेतील त्रुटींवरून सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
जवळपास दीड तास सभागृहात गदारोळ सुरू होता. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर व महापालिका सचिव यांच्यावर धारेवर प्रश्नांचा भडीमार करत प्रशासनाला धरले. काही नगरसेवकांनी सचिवांनी महानगरपालि जयते.. अशीही मागणी केली. सभेच्या अजेंडावर आउटवर्ड क्रमांक नसणे, सात दिवस आधी नोटीस न देणे तसेच विषयांवरील सविस्तर टिप्पणी नसल्याचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचे नगरसेवक अॅड. दीपक सूळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपचे गटनेते अॅड. दीपक मठपती यांनीही ही विशेष सभा आहे की सर्वसाधारण सभा ? असा सवाल उपस्थित केला.
नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे नगर सचिवांनी अखेर यापुढे अशा बाबींवर दिलगिरी व्यक्त केली. काही न्यायप्रविष्ट प्रश्न सभागृहात मांडल्यावर नगरसेवक रविशंकर जाधव यांनीही अधिकाऱ्यांना सुनावले. सभेच्या प्रारंभी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. सभेदरम्यान प्रशासनाची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. मागील काळात जे झाले ते पुढे चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे नगरसेवक गिरीश पाटील यांनी दिला. काँग्रेसचे नगरसेवक विकास कांबळे यांनी ईदगाह मैदानावर मंडप उभारण्याची तसेच वस्ताद लहूजी साळवे यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली.
नगररचना विभागात दलालांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक गणेश गवारे यानी सभेत केला. महानगरपालिका इमारतीत महिला सदस्यांसाठी स्वतंत्र महिला कक्ष नसल्याचा मुद्दा भाजपच्या नगरसेविका रागिणी यादव यांनी उपस्थित केला. नागरिकांकडून विविध दाखले काढताना पैसे मागितले जात असल्याची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक युनिस मोमिन यांनी सभेत मांडली. सभागृहात घड्याळ बंद असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. प्रोसिडिंग लिहायला अधिकारी नाहीत, मग सर्वसाधारण सभा कशाला? असा सवाल अॅड. दीपक सूळ यांनी उपस्थित केला.






