राजकीय विरहाची २० वर्षे अन् ठाकरे बंधू; मनोमिलन होणार की मराठीचा 'विजय' मोर्चापर्यंत सीमित राहणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण आहे. तब्बल वीस वर्षांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी दोन बंधू एका विजय रॅलीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींची चर्चा सुरू असून या मेळाव्याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
वरळीच्या एनएससीआय डोममध्ये सकाळी १० वाजता होणारी ही विजय रॅली केवळ मराठी भाषेच्या प्रश्नावर विजय साजरा करण्यापुरती मर्यादित राहते की राजकीय युतीची नांदी ठरते? मुंबई, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात भाषिक, सांस्कृतिक भावनिक नातं असलेले दोन पक्ष एकत्र आले तर त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होतील. इतर राजकीय पक्ष याकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहतात,या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेणार आहोत.
….कारण हिंदी सक्ती
केंद्र सरकारने संपूर्ण देशात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात पाचवीपासून हिंदी विषय शिकवला जातो, मात्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी पहिलीपासून अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल होता. मात्र राज्यातील जनता, साहित्यीक,कलाकार आणि ठाकरे बंधूंनी याला कडाडून विरोध केला. मनसेने ५ जुलै रोजी भव्य निषेध मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्या मोर्चाला शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघणार होता. मात्र त्याचवेळी राज्य सरकारने जीआर रद्द करून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. मात्र ठाकरे बंधू मोर्चा मागे न घेता तोच मोर्चा विजयी मोर्चा म्हणून निघेल असं जाहीर केलं. त्यानुसार आज ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसणार आहेत.
वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ७ ते ८ हजार लोकांना बसण्याची व्यवस्था असलेल्या एनएससीआय डोममध्ये एलईडी स्क्रीन लावून सभागृहाच्या बाहेर आणि आजूबाजूच्या परिसरातही थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. लेखक, कवी, संपादक, शिक्षक, कलाकार यांच्यासह विविध मराठी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर या रॅलीत सहभागी होणार आहेत. ठाकरे बंधूंसह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मंचावर उपस्थित राहणार असून, त्यांच्या भाषणांमधून आगामी राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र शरद पवार मुंबईत असूनही ते उपस्थित राहणार नसल्याचे संकेत आहेत. सपकाळ यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. या गैरहजेरीमुळे काँग्रेस आणि शरद पवार ‘मराठी अस्मिते’च्या मुद्यावर सावध भूमिका घेतल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी मात्र या एकतेवर संशय व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागे ‘मराठी हितापेक्षा’ आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय अस्तित्व टिकवण्याचा हेतू असल्याचा आरोप केला. तर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बीएमसीवर सत्तेवर असताना मराठी जनतेला मुंबई सोडावी लागल्याचा दावा केला आहे. तसंच आगामी बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं एकत्र येणं ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
भाजप आणि शिंदे गटासाठी ठाकरे बंधूंची ही एकता विशेषतः चिंतेची बाब आहे. मुंबईसारख्या शहरी भागात आणि बीएमसीमध्ये गेल्या काही काळात मराठी मतांचं विभाजन भाजपच्या बाजूने गेलं. मात्र आता ही मत पुन्हा एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. दोघंही अनुभवी, ओळखले गेलेले आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेते असल्यामुळे, त्यांच्या एकत्र येण्याने मराठी माणसात असलेली अस्मितेची भावना पुन्हा जागू शकते. दोन्ही बंधूंमध्ये विभागलेली शिवसेनेची मते एकत्र होण्याची शक्यता आहे, ज्याची धास्ती एकनाथ शिंदे आणि भाजपला आहे.
दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसाठी हे एक नाजूक टप्पा आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली महाविकास आघाडी जर राज ठाकरे यांच्यासोबत सत्ताबांधणी करत असेल, तर काँग्रेसला आपली जागा नव्यानं शोधावी लागेल. शरद पवार आणि काँग्रेसने या विजय रॅलीपासून अंतर ठेवणं, हे देखील एका प्रकारचं ‘वेट अँड वॉच’ असल्याचं मानलं जात आहे. विरोधी पक्षातही नव्या ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू होऊ शकतं. युतीतील नेतृत्व, जागावाटप, आणि प्रभावाच्या क्षेत्रांवर याचा थेट परिणाम होईल.
Kunal Kamra : मोठी बातमी! कुणाल कामरा, सुषमा अंधारे अडचणीत; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर
शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर याचा सर्वाधिक फायदा मनसेलाच होईल, असं सांगितलं जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज ठाकरे यांना फारसा राजकीय यश मिळालेलं नाही. पण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र आल्याने बळ मिळू शकतं. शिवसेना (उद्धव) ला देखील मनसेच्या संघटनात्मक ताकदीचा फायदा होईल. एकूणच, हे पुनर्मिलन दोघांनाही पुन्हा केंद्रस्थानी आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रतिक्षा आहे ती दोन्ही बंधू एका मंचावर आल्यानंतर कोणती घोषणा करतात याची. एकत्र येऊन नवं समीकरण घडवतात की मराठीचा विजय मोर्चापर्यंतच मर्यादीत ठेवतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.