मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेनेचं कार्यालय असेलेल्या ठिकाणी मोठा राडा झाल्यानंतर शिंदे गटाकडून पालिकेतील कार्यालयात मोठमोठ्या नेत्यांची फौज पाठवण्यात आली होती. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, यशवंत जाधव, शितल म्हात्रे अशी दिग्गज नेत्यांनी नेतृत्व करत शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गदारोळावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
“कार्यालयाचा वाद हा विषय येऊच शकत नाही. तिथे अधिकृतपणे शिवसेनेचं कार्यालय आहे. पण या लोकांनी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलाय. तो पोलिसांनी मोडून काढावा. नाहीतर आम्ही मोडून काढू”, असा देखील इशारा त्यांनी दिला.
“शिंद गटाचे काही खासदार आणि नगरसेवक जाणूनबुजून कुरापती काढण्याचे प्रकार करत आहेत. मुंबई महापालिकेतील कार्यालय आता शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात आहे. आमच्या माजी महापौर, नगरसेवक नियमीतपणे तिथे बसत असतात. पण खासदार राहुल शेवाळे यांनी बेशिस्तपणाची वागणूक करुन, ठाण्याचे नरेश मस्के यांना बोलवण्याचा प्रश्नच येत नाही”, अशी भूमिका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मांडली.
“त्यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय तो निषेधार्थ आहे. लोकं उभं करुन, कार्यालयात घुसून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पक्षाचे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या गटाच्या माणसांनी अशाप्रकारे कायदा-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.