ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली वांगणी व बेलवली (बदलापूर) येथे ५ ऑगस्ट २०२५ रोजी दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक उपक्रम राबविण्यात आले आहे.
यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, गटविकास अधिकारी अंबरनाथ पंडीत राठोड, उप अभियंता पंकज कोचुरे आदी अधिकारी उपस्थित होते.वांगणी ग्रामपंचायतीत “उमेद फाउंडेशन”च्या सहकार्याने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ब्लँकेट व टॉवेल वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे यांनी वॉर्ड क्रमांक ५ येथील काही लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
या दौरादरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, वांगणी येथे भेट देऊन उपलब्ध सेवा, औषधसाठा, आरोग्य कर्मचारी यांची उपस्थिती, रुग्णसेवा आदी बाबींची पाहणी केली. त्याचप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामांची प्रगती जाणून घेतली व संबंधित उप अभियंत्यांना काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.बेलवली (बदलापूर) येथे प्रस्तावित मॉलसाठी निश्चित केलेल्या जागेची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगार व व्यवसायवृद्धीच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कल्याण येथील बेहरे- खडवली ग्रामपंचायत येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सखोल दप्तर तपासणी केली आहे. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे उपस्थित होते. तसेच प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी कल्याण येथील ओझर्ली – राया येथे ग्रामपंचायतीची सखोल तपासणी केली. जिल्हा परिषद, ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्याचे कार्य कटिबद्धतेने पार पाडत आहे. सामाजिक संवेदनशीलता व विकासाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व मोलाचे आहे.