दिवा: दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल सायंकाळी अंदाजे ५.३० वाजता काळुबाई बिल्डिंग, विकास म्हात्रे गेट परिसरात दोन वर्षांची बालिका वेदा विकास काजारे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर मागून हल्ला केला. मोकाट श्वानांची दहशत पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे.
या हल्ल्यात लहानगी वेदाला गंभीर जखमा झाल्या असून कुटुंबीयांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत.बालिका वेदाच्या आईचे नाव मीनाक्षी विकास काजारे व वडिलांचे नाव विकास दगडू काजारे असे आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की “दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसले आहे, हे मान्य केले जाणार नाही.”
तसेच त्यांनी इशारा दिला आहे.
“जर महापालिकेने तात्काळ भटके कुत्रे पकडण्याची व त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीने कार्यवाही केली नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असे अॅड.रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.दिवा परिसरातील नागरिकांनीही या घटनेची दखल घेऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे. आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कोणत्या गतीने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






