गायमुख जकात नाक्याजवळील गायमुख घाट उतरणीवर शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीच्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा भीषण अपघात झाला. ठाण्याच्या दिशेने येणारा MH 04 KF 0793 क्रमांकाचा कंटेनर विरुद्ध दिशेने बोरिवलीकडे जाणाऱ्या एकूण 11 वाहनांना धडकला. या अपघातात चार जण गंभीर व किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सकाळी साडेसात वाजता या घटनेची माहिती प्राप्त झाली.या अपघाताच्या घटनेची माहिती भालेराव यांनी दिली. कंटेनरमध्ये अंदाजे 35 ते 40 टन सिमेंट गोण्या भरलेल्या होत्या. अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
या अपघातात रिक्षाचालक शिवकुमार यादव (वय 56 ) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रिक्षामधील प्रवासी तस्किन शेख (वय 45 ) व अनिता पेरवाल (वय 45 ) यांना चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून, कारचालक रामबली बाबूलाल (वय 22 ) यांना कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. या चौघांनाही ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर काही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासारवडवली पोलीसांनी दिली.
अपघातात होंडा सिटी, व्हॅगनार, इर्टिगा, महिंद्रा XEV 9E, इनोव्हा, डिझायर, सुझुकी ब्रेझा, फोर्ड कार तसेच एक ऑटो रिक्षा अशा एकूण 11 वाहनांचे कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल सांडल्याने घसरणीचा धोका निर्माण झाला होता.
घटनेनंतर कासारवडवली पोलीस, शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सांडलेल्या ऑईलवर माती टाकून रस्ता सुरक्षित करण्यात आला. अपघातामुळे घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती.सध्या सर्व अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून, घोडबंदर रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. अपघाताच्या कारणांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






