भाईंदर / विजय काते : भाईंदर पूर्वेतील गोल्ड नेस्ट परिसरात असलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रविवारी दुर्दैवी घटना घडली. या कॉम्प्लेक्समधील स्वीमिंग पूलमध्ये पोहत असताना ११ वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा या बालकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना समोर येताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.या घटनेनंतर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, एफआयआरमध्ये केवळ तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. यामुळे या घटनेच्या मुळ कारणांची जबाबदारी झाकली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. मीराभाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर मनसेने “राम नाम सत्य है, आयुक्त साहेब मस्त आहे” अशा घोषणाबाजी करत एक अंत्ययात्रा मोर्चा काढला. या आंदोलनात पालिकेच्या निष्काळजी कारभाराविरोधात संतप्त नागरिकही सहभागी झाले होते. मनसेने आयुक्तांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी केली असून दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, असं ठणकावून सांगितलं.दुसरीकडे, शिवसेनेच्या लीगल सेलमार्फत अधिकृत पत्रव्यवहाराद्वारे याप्रकरणात केवळ कर्मचाऱ्यांवर नव्हे, तर संबंधित कंत्राटदार व व्यवस्थापकांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या देखभाल व सुरक्षेसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
या घटनेनंतर पालिकेच्या दुर्लक्षामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेला, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं सर्वच राजकीय पक्षांकडून सांगण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मुलांची सुरक्षितता हे प्रशासनाचं प्राथमिक कर्तव्य असताना त्यात झालेल्या घोर दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचं स्पष्ट होतं.या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.