कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी, ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला गालबोट
कल्याण – विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून सर्वच पक्षात चढाओढ सुरु आहे. अशातच आता कल्याणमध्ये राजकीय वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे यांनी दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्यासाठीचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावले होते. मात्र दुर्गाडी चौकात त्यांनी लावलेले भले मोठे बॅनर काही अज्ञातांनी फाडल्याची घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी तारे यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. आतापासूनच विरोधकांनी आमचा धस्का घेतला आहे, म्हणूनच त्यांनी हे घा णेरडे राजकरण सुरू केले. मात्र त्यांना हे कळत नाही की, अशा वागणूकीने कधी निवडणुका जिंकता येणार नाही. अशा कठोर शब्दांत तारेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा- “महायुतीच्या सरकारमुळे कणकवली स्मार्ट होणार”, नितेश राणे यांची प्रतिक्रिया
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईनाथ तारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे. तारे यांनी दुर्गाडी चौकात शिवसेनेचा शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले होते. हे बॅनर दुपारच्या सुमारास फाडल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच तारे यांनी काढलेल्या बॅनरची पाहणी केली.
हेही वाचा- मोठी बातमी! ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; आतापर्यंत ५ महिन्यांचे पैसे खात्यात जमा
दुर्गाडी चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बॅनर नव्हता यामुळेच मी दसरा मेळाव्याचे जाहिरात करणारे अधिकृत बॅनर लावले होते. या मोठ्या बॅनरमुळे लोकांचे लक्ष या बॅनरकडे वेधले जात होते. विरोधकांनी तारे मामांचा इतका धक्का घेतला आहे की त्यांनी बॅनरच पाडले आहे. इतक्या घाणेरड्या प्रकारचे राजकारण केले जाऊ नये. दसरा मेळावा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला असून या बॅनरवर बाळासाहेबांचा भला मोठा फोटो होता. बॅनर फाडून विरोधकांनी बाळासाहेबांच्या फोटोची विटंबना केली आहे. शहरात बाळासाहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे मात्र विकृत विचार बुद्धीच्या लोकांनी हा जो प्रकार केला आहे तो निंदनीय आहे या गोष्टीची मी निंदा करतो अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे साईनाथ तारे यांनी दिली आहे. तसंच याबाबत पक्षश्रेष्ठींशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.